

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'मी गेली चाळीस वर्षे तळजाई टेकडीवर पहाटे फिरायला येतोय. अजूनही फिट आहे. मला कसलाही त्रास नाही. पहाटे उठून इथे आल्याने भरपूर ऑक्सिजन मी घेतला. माझ्यावर तळजाईकृपा झाली अन् मी दीर्घायुषी झालो.' हे उद्गार आहेत वयाची 101 वर्षे पार केलेल्या शहरातील बाबूराव काळे यांचे. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1921 सालचा.
वयाची शंभरी पार करून सोमवारी त्यांनी 102 व्या वर्षात पदार्पण केले. तळजाई भ्रमण मंडळाच्या वतीने काळे यांचा सत्कार करण्यात आला. पहाटेच्या वेळी तळाजाई टेकडीवर त्यांच्या सत्कारावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी नगरसेवक सुभाष जगताप, नरेंद्र व्यवहारे, अनंत ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना 101 वर्षे पार करणारे बाबूराव काळे म्हणाले, मी महसूल विभागात नोकरी केली. 1979 साली सेवानिवृत्त झालो. शेवटची दहा वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. निवृत्त झाल्यावर मात्र एक नियम नियमित पाळला तो म्हणजे सूर्योदयापूर्वीच पहाटे पाच वाजता उठून तळजाई टेकडीवर दररोज फिरायला येण्याचा.
या दिनचर्येमुळे मी आजही 102 व्या वर्षी प्रसन्न आहे. मला कोणताही आजार नाही. मात्र, कोरोना आला तेव्हापासून टेकडीवर फिरायला जाणे बंद केले. आता घराजवळ फिरतो. पहाटे उठल्याने भरपूर ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे माझ्यावर तळजाईची कृपा झाली अन् मी दीर्घायुषी झालो. या वेळी तळाजाई भ्रमण मंडळातील प्रत्येक सदस्याने त्यांचे अभिनंदन केले.