

पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 30 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील देखील काही पर्यंटकांचा समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून व जगभरातून निषेध करण्यात आला आहे.
या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे निष्पन्न झाले असून, आता पाकिस्तानवर थेट कारवाईची मागणी होऊ लागली आहे. या हल्ल्याचा काही माजी लष्करी अधिकार्यांनी देखील निषेध केला असून, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची आता वेळ आली आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दुर्दैवी घटना, भारतीय जवान नक्कीच चोख प्रत्युत्तर देतील: निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा भ्याड हल्ला आहे. सुट्या घालवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांवर करण्यात आलेला हा पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला आहे. ज्याप्रकारे हे कृत्य करण्यात आले आहे त्यानुसार यामागे दहशतवाद्यांचे मोठे प्लॅनिंग होते असेच म्हणावे लागेल. साधारण दोन ते तीन महिन्यांपासून त्यांची ही तयारी सुरू होती. ज्या ठिकाही हा हल्ला झाला, तो अतिशय दुर्गम भाग आहे. आजूबाजूला मोठे जंगल देखील आहे.
दहशतवाद्यांनी हे हेरले आणि त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक हा हल्ला केला आहे. या ठिकाणी असलेल्या गावातील घराघरांत दहशतवादी आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 27 पर्यंटकांचा मृत्यू झाला, हे दुर्दैवी आहे. या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे. याचा तोटा हा सर्वसामान्य काश्मिरी जनतेला भोगावा लागणार आहे. जम्मू-काश्मीरमधील जवळपास 90 टक्के नागरिक दहशतवादाविरोधात आहेत.
फक्त 10 टक्के लोकांचाच पाठिंबा त्यांना आहे. या हल्ल्यामुळे येथील पर्यटनावर दूरगामी परिणाम होणार आहे. पाकिस्तानला हेच हवे आहे. जेणेकरून येथील युवक बेरोजगार होऊन हातात बंदुका घेतील. मात्र, आत्तापर्यंत त्यांना अपयश आले आहे. हा हल्ला कुणी केला, कसा केला, याचा तपास तपासयंत्रणा नक्कीच करतील व त्यांना चोख उत्तर देऊन यमसदनी धाडतील. सरकार सर्जिकल स्ट्राइकचा देखील विचार करू शकते.
पाकिस्तानचे चार तुकडे हाच पर्याय: ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडून संताप
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हा दहशतवादी हल्ला अतिशय नियोजनपूर्वक करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे आता तपास यंत्रणांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. कारण दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यात त्यांचा धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले आहे, हे भयानक आहे. येत्या काळात अमरनाथ यात्रा आहे.
त्यामुळे या यात्रेला संरक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला धडा शिकवायला हवा. जोपर्यंत पाकिस्तान आहे तोपर्यंत जम्मू-काश्मीर शांत राहणे अशक्य आहे. पाकिस्तानला चीनची देखील मदत मिळत आहे. हे दोन्ही देश भारताला त्रास देण्याचे धोरण आखत असतात. त्यामुळे याविरोधात संपूर्ण देशाने एक होऊन लढणे गरजेचे आहे.
ही लढाई अनेक वर्षे चालणारी आहे. हे सर्व थांबवायचे असेल, तर पाकिस्तानचे चार तुकडे करणे गरजेचे आहे. बलुचिस्तान, खैबरपखतून, सिंध, पंजाब अशी विभागणी करणे गरजेचे आहे. असे झाल्यास पाकिस्तानची ताकद कमी होऊन पुन्हा भारताविरोधात कोणतीही कारवाई करू शकणार नाही.
जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर होणार परिमाण: मेजर जनरल शिशिर महाजन
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आता पर्यटकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटक हे अतिशय सॉफ्ट टार्गेट आहे. तसेच, जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे आता पर्यटकांना लक्ष केले जात आहे. यापूर्वी बाहेरच्या नागरिकांना सॉफ्ट टार्गेट केले जात होते. त्याआधी काश्मिरी पंडितांवर हल्ले करण्यात आले. मात्र, तरीसुद्धा जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही.
यामुळे असे कारस्थान पाकिस्तानतर्फे आखले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. येथे सिनेमगृहे देखील पाहिल्यांदा अनेक वर्षांनंतर खुली झाली आहेत. स्थानिक नागरिकांना मोठा व्यवसाय मिळत आहे. मात्र, या हल्ल्यामुळे आता पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक करण्यात यावा. जर हे देखील कमी पडत असेल, तर आपले कमांडोद्वारे ही कारवाई केली जावी. सरकार या हल्ल्याला नक्कीच चोख उत्तर देईल.
सर्जिकल स्ट्राइक होण्याची गरज आहे आणि होईलही: ब्रिगेडिअर अंबिके
पाकिस्तानने केलेला हल्ला हा भित्रेपणाचे लक्षण आहे. पाकिस्तान भारताला पारंपरिक युद्धात हरवू शकत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांच्या आडून हा हल्ला केला जात आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यात तहरिके पाकिस्तानचे दहशतवादी व बलुचिस्थान लिब्रेशन आर्मीचे लोक पाकिस्तान लष्कराला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांचे लक्ष्य दूर करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अतिशय निंदनीय कृत्य: ब्रिगेडिअर प्रदीप आपटे
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेला हल्ला हा अतिशय भ्याड आणि निंदनीय आहे. सुटीचा आनंद घेणार्या निशस्त्र नागरिकांवर हा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला अतिशय चीड आणणारा आहे. पर्यटक भेळ खात होते, तर काही थंडीचा आनंद घेत होते, त्या वेळी हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला केलेले ठिकाण दुर्गम होते. त्यामुळे लवकर मदत मिळणार नाही, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी हल्ल्याचे हे ठिकाण निवडले. सर्वात वाईट म्हणजे हिंदू आहे की मुस्लिम हे विचारून त्यांनी हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे आता दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे.