

नवी सांगवी : पिंपळे सौदागर येथील रेनबो प्लाझा इमारतीमध्ये गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. इमारतीमधील पाचही मजल्यांवर आग लागून धूर मोठ्या प्रमाणात पसरत होता. या वेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी 40 हून अधिक नागरिकांची सुटका केली.
शिवार गार्डन येथील मुख्य चौकात रेनबो प्लाझा ही पाच मजली इमारत आहे. इमारतीच्या लिफ्टचे दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे पहिल्या मजल्यापासून ते पाचव्या मजल्यापर्यंत आग पसरत गेली.
आगीमुळे सर्वच मजल्यांवर मोठ्या प्रमाणात धूर पसरत असल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच औंध, हिंजवडी, पिंपरी, राहटणी येथील अग्निशामक दलाची हायड्रोलिक स्काय लिफ्ट असणारी दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण राखत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या वेळी चौथ्या व पाचव्या मजल्यावर जवळपास चाळीसहून अधिक नागरिक अडकले असल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत हायड्रोलिक स्काय लिफ्ट वाहनाच्या सहाय्याने ऑक्सिजन सिलिंडर खांद्यावर घेत चौथ्या व पाचव्या मजल्यावर प्रवेश केला.
काही नागरिकांना इमारतीच्या मागील बाजूने खाली उतरविण्यात आले. तर, काहींना पुढील बाजूने सुरक्षितरित्या उतरविण्यात आले. घटनास्थळी जीवितहानी झाली नसल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशामक अधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.