पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित झाले. भविष्यात कोणतीही महामारी अथवा साथ उद्भवल्यास आरोग्य यंत्रणेला सक्षमतेने सामना करावा लागणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 1100 हून अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कमला नेहरू रुग्णालयासह 54 दवाखाने कार्यरत आहेत. आरोग्य विभागांतर्गत चारही वर्गांची मिळून 2067 मान्य पदे अस्तित्वात आहेत. त्यापैकी सध्या केवळ 960 पदे कार्यरत असून, 1107 पदे रिक्त आहेत. यापैकी 260 पदे कंत्राटी पध्दतीने, तर बाँडवर 37 पदे भरण्यात आलेली आहेत. रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 41 दवाखाने, 18 प्रसूतिगृहे, एक संसर्ग नियंत्रण रुग्णालय आणि एक सामान्य रुग्णालय आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आणि अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना ससून रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागते किंवा खासगी रुग्णालयात उपचारांसाठी मोठी किंमत मोजावी लागते.
महापालिकेकडून सध्याची रुग्णालये अधिकाधिक सक्षम करण्याऐवजी आणि आवश्यक कर्मचारी भरती करण्याऐवजी आणि काम पूर्ण करण्याऐवजी हळूहळू सर्व रुग्णालयांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यातून धडा घेऊन महापालिकेने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर भर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये, तसेच इतर दवाखान्यांमध्ये अनेक उपचारांच्या सुविधा उपलब्ध असल्या, तरी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होतात. दुसरीकडे, स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या कौशल्यांचा पुरेसा वापर होत नसल्याने आणि त्यांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी वेतन मिळत असल्याने डॉक्टर महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येण्यास तयार होत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.