

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडकरांनाच पीएमपी प्रवासासाठी मासिक पास देण्यात येत होते. मात्र, आता पीएमपी प्रशासनाकडून पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांनाही मासिक पास देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पीएमआरडी हद्दीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएमपी संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (दि. 31) पार पडली. या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर व अन्य उपस्थित होते.
बैठकीत प्रशासनाच्या वतीने 15 विषयांचे ठराव संचालक मंडळासमोर मांडण्यात आले होते. त्यापैकी हा ठराव होता. त्या ठरावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पीएमआरडीए हद्दीतील नागरिकांनादेखील मासिक पास उपलब्ध होणार आहेत. या पासचे दर लवकरच ठरविण्यात येणार असून, पीएमपीकडून पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांकरिता पास केंद्रदेखील उपलब्ध करण्यात येतील.
या वेळी झालेल्या बैठकीत पीएमपीच्या विविध मालमत्तांचा व्यावसायिक तत्त्वावर विकास करण्यासाठी त्याचे अधिकार पीएमपीएमएलचे अध्यक्षांना देण्याचा ठराव होता. याला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पीएमपीच्या मालमत्तांचा विकास करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
पीएमपी प्रशासन पूर्वी ताफ्यातील बस 7 लाख किलोमीटर किंवा 10 वर्षांनंतर स्क्रॅप करत होते. त्या कालावधीत आता वाढ करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता 8.40 लाख किलोमीटर किंवा 12 वर्षांनंतर या बस स्क्रॅप केल्या जाणार आहेत.
पीएमआरडीए हद्दीतील स्थिती…
पीएमआरडीए भागातील मार्ग : 113
मार्गावर धावणार्या रोजच्या बस : 490
रोजच्या एकूण फेर्या : 4 हजार 918
रोजची प्रवासी संख्या : 2 लाख 53 हजार 506
रोजचे उत्पन्न : सुमारे 35 लाख 67 हजार 315
हेही वाचा