

पुणे : राज्यातील बहुतांश भागांतून सोमवारी 28 जुलैपासून पाऊस कमी होत आहे. मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी तर पुणे घाट आणि सातारा घाटात सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याच भागात 29 जुलैपर्यंत पाऊस राहील तसेच विदर्भातील जिल्ह्यांत 31 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागांतून मात्र पाऊस कमी होत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसात उद्यापासून राज्यातील बहुतांश भागात जोर ओसरणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा सोडला तर बाकीच्या भागांतून पाऊस पूर्णपणे कमी होत आहे. विदर्भात मात्र 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला. जुलैच्या जवळजवळ 25 दिवस या भागात पाऊस नव्हता. मात्र, जुलैच्या अखेरच्या आठवड्यात या भागात चांगला पाऊस झाला. या पावसाने महिन्याची सरासरी मात्र भरून निघाली नाही. आता ऑगस्ट महिन्यावरच मदार आहे.
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 72 तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्रभर बहुतांश भागांत पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील भोर, कुरवंडे, निमगिरी या भागात अतिवृष्टी झाली तर शहरात बहुतांश भागात दहा ते पंधरा मिनिटे पावसाची नोंद झाली.
शनिवारी रात्री झालेला पाऊस (मि.मी.)
भोर ९६.५, कुरवंडे ९५, निमगिरी ८२, लवळे १३.५, तळेगाव १२.५, राजगुरुनगर ९, हडपसर ८.५, शिवाजीनगर ८.२, चिंचवड ५, हवेली ४.५, कोरेगाव पार्क ४, धामधरे २.५, दौंड १.५, मगरपट्टा १, बारामती ०.४.