पुणे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या तयारीच्या हालचालीस सुरुवात दिसायला लागली असून, तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आगामी 48 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी एप्रिलअखेर बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली दिसण्यास सुरुवात होते. त्यानंतर चक्रीवादळांची निर्मतिी होऊन 1 ते 5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये, तर 10 ते 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात येतो. यंदा मान्सूनच्या हालचाली एक आठवडा उशिरा दिसून आल्या आहेत.2 मे रोजी दुपारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतानाच्या हालचाली दिसू लागल्या.
तेथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, आगामी 48 तासांत म्हणजे 6 मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. पाच मेच्या रात्रीपासून वायव्य भारतावर ताजा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. तर, 6 मे रोजी चक्रीवादळ तयार होत आहे. या दोन प्रक्रिया एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन वार्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा अवकाळी पावसाचा प्रवास सुरू होत असून, वादळीवार्यासह पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला वार्याचा वेग 30 ते 40, तर 48 तासांनंतर तो 50 पेक्षा जास्त वाढणार आहे.
शनिवारपर्यंत राज्यात पाऊस
मे महिन्याचा पहिला आठवडा पावसाचा असून, अवकाळीचा मुक्काम 6 मेपर्यंत राहणार आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वार्याचा प्रभाव महाराष्ट्रावर असल्याने 3 ते 6 मेदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला पुन्हा तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, 4 मे रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.