खडकवासला: भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणार्या राजगड व पश्चिम हवेली तालुक्यातील भाताची लावणी सततच्या पावसामुळे रखडली आहे. अशीच स्थिती राहिल्यास भात लावणीची शक्यता धूसर आहे.
भातासह हजारो हेक्टरवरील इतर पिकांची पेरणी करणे पावसामुळे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. दुसरीकडे पावसाची स्थिती समान असताना राजगड व पश्चिम हवेली तालुक्यातील खरिपाच्या प्राथमिक अहवालात विभिन्नता असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
पुण्यात बसून कृषी खात्याचा कारभार हाकणार्या अधिकारी, कृषी सहाय्यकांच्या गलथान कारभारामुळे हवेली तालुक्यात दोन हजार शंभर हेक्टर क्षेत्रात भातरोपांचे बेड (रोपे) तयार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, तर राजगड तालुक्यात दोन टक्के क्षेत्रावरच भातरोपांची पेरणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
15 मेपासून सतत कोसळणार्या पावसामुळे जमिनीत वाफसा होणे अवघड झाले आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक क्षेत्रावर भाताच्या पेरण्या झाल्या नाहीत. काहींनी कशीबशी बियाण्यांची पेरणी केली. परंतु, सततच्या पावसामुळे निम्म्याहून अधिक रोपांची उगवण झाली नाही. भातखाचरांसह सर्व शिवारात गवत, झुडपे, दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मशागत करणे कठीण झाले आहे.
पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. सततच्या पावसाने पाण्याचा निचरा होत नसल्याने खाचरांत गवत वाढले आहे. राजगड, तोरणा, पानशेत, वरसगावसह सर्वत्र असेच चित्र आहे. हवेली तालुक्याच्या सिंहगड, खानापूर, मोगरवाडी, खामगाव मावळ, आंबी वरदाडे, मांडवी, जांभली, सांगरुण, कल्याण आदी भागांत अशीच गंभीर स्थिती आहे.
याबाबत राजगड तालुका कृषी अधिकारी सुनील ईडोळे पाटील म्हणाले, केवळ दोन टक्के क्षेत्रावरच भाताची लावणी झाली आहे. जमिनीत वाफसा तयार होण्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रोपांच्या पेरण्या करूनही वेळेवर लावणी होणार नाही, याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.
आंबी (ता. हवेली) परिसरात दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्र भाताचे आहे. मात्र, 70 ते 75 टक्के क्षेत्रावर लागवडीसाठी रोपेच नाहीत. गवत, दलदलीमुळे रोपे वाया गेली आहेत. त्यामुळे यंदा खाचरे पडीक राहण्याचा धोका आहे.
-शंकर निवंगुणे, शेतकरी
हवेली तालुक्यात अडीच हजार हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. त्यापैकी दोन हजार शंभर हेक्टर क्षेत्रासाठी भातरोपांचे बेड तयार झाल्याची माहिती स्थानिक कृषी सहायकांनी सादर केली आहे.
- गणेश धस, प्रभारी कृषी अधिकारी, हवेली तालुका कृषी विभाग