खडकवासला: पानशेत-वरसगाव खोर्यात मंगळवारी (दि. 1) सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता 15.20 टीएमसी (52.14 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. गेल्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात 0.68 टीएमसीची वाढ झाली आहे.
सोमवारी (दि. 30) सायंकाळी धरणसाखळीत 14.52 टीएमसी पाणी होते. सिंहगड खडकवासला परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र पानशेत, वरसगावसह टेमघर धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. (Latest Pune News)
त्यामुळे चारही धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ सुरू आहे. पानशेत धरण बुधवारी (दि. 2) पन्नास टक्के भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे. दिवसभरात टेमघर येथे 16, वरसगाव येथे 19, पानशेत येथे 16 आणि खडकवासला येथे 3 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत 1 .28 टीएमसी (64. 75 टक्के), पानशेत 5.21 टीएमसी (48.91 टक्के), वरसगाव 7.27 टीएमसी (56.69 टक्के) आणि टेमघर धरणात 1.44 टीएमसी (38.93 टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे.