

पुणे, पुढारी वृत्तसेवा : नैऋत्य मान्सून अरबी समुद्राकडून रविवारी कोकणासह गोव्यात दाखल झाला. यंदा तो चार दिवस उशिराने पोहोचला आहे. दक्षिण कोकण व संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापण्यास सुरुवात झाली आहे. चोवीस तासांत तो आणखी सक्रिय होईल. पुढील तीन-चार दिवसांत तो महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचण्याचा अंदाज आहे.
मान्सून लवकरच मुंबईसह महाराष्ट्र काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, मान्सूनची दुसरी शाखाही सक्रिय झाली असून तो बंगालच्या उपसागराकडून बिहारमार्गे 48 तासांत उत्तर भारतात प्रवेश करणार आहे.
नैऋत्य मान्सूनचे रविवारी दुपारी दीड वाजता कोकण आणि गोव्यात आगमन झाले. वैभववाडीत सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान, दक्षिण कोकणातील काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेशचा काही भाग त्याने व्यापला. त्यामुळे राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नाशिक, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरांत पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यावेळी ढगाळ वातावरण असेल; तर वादळी वार्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून 48 तासांत मुंबईत…
बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिम किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण झाले. पुढील 48 तासांत मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
गणपतीपुळ्यात पर्यटक बचावले
रत्नागिरी : बिपरजॉय वादळाचा प्रभाव कोकणच्या किनारपट्टीवर जाणवत आहे. गणपतीपुळे येथे 12 फुटांपर्यंत लाटा उसळल्या. कठड्यावर बसलेल्या तसेच समुद्रात उतरलेल्या पर्यटकांना रविवारी या लाटांचा तडाखा बसला. उधाणाच्या लाटेत हे पर्यटक समुद्राच्या
पाण्यात ओढले गेले. समुद्रकिनारी असणार्या इतर नागरिकांनी वेळीच मदत केल्याने हे सर्व पर्यटक बचावले.
या लाटांमुळे येथील काही स्टॉलमध्येही पाणी शिरून विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यंदा मान्सून लांबला असला तरी बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळला आहे त्याचा हा परिणाम आहे.
समुद्रात 10 ते 12 फूट उंचीच्या लाटा उसळत असून याचा तडाखा किनारपट्टी भागाला बसत आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजता उधाणाच्या लाटेचा तडाखा गणपतीपुळेत आलेल्या पर्यटकांना बसला. अचानक आलेल्या लाटेने ते समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. या घटनेनंतर पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ उडाली. समुद्रात ओढले गेलेल्या पर्यटकांना अन्य लोकांनी पाण्याबाहेर काढले. तातडीने मदत मिळाल्याने ते सर्वजण बचावले.
या लाटेमुळे समुद्राचे पाणी नजीकच्या स्टॉलमध्ये शिरल्याने विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी समुद्रात अशाच लाटा उसळल्यामुळे किनार्यालगतच्या व्यापार्यांनी आधीच सामान हलविले होते. रविवारच्या घटनेत लाटेमुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता कमी झाली आहे.