

पुणे : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक कर्मचार्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी, नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलिस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच पोलिस विभागाच्या अधिकार्यांसह निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, मतदान केंद्रांवर उपलब्ध करण्यात येणार्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी, आदी सूचना या वेळी निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. त्याचबरोबर निवडणुकीत रोकड, मद्य, तसेच इतर कोणत्याही स्वरूपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर, तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करण्याच्यादेखील सूचना दिल्या.
हेही वाचा