पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत पैशाचा धूर

पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत पैशाचा धूर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 20 वर्षांनंतर होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीत विकास सोसायटी, ग्रामपंचायत आणि व्यापारी-अडते मतदारसंघातील उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मतदारांना प्रलोभनापोटी या तीनही गटांतील निवडणुकीत सुमारे 45 ते 50 कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे.

काहीही करून निवडणुकीत विजयी व्हावे, या अट्टहासापोटी सोसायटी मतदारसंघातील दोन्ही पॅनेलमध्ये चढाओढ सुरू असून, अक्षरश: पैशाचे खिरापतीसारखे वाटप सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल विरुद्ध अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी (हवेली तालुका) या सर्वपक्षीय पॅनेलमध्येच थेट लढत होत आहे.

दोन्हीही पॅनेलकडून विजयाचे आडाखे कसे आमच्याच बाजूने असल्याचे छातीठोकपणे सांगितले जात आहे. आमदार, खासदार, बाजार समितीचे माजी सभापती, माजी संचालक असे सर्व जण सभेच्या निमित्ताने पुढे येऊन आमच्याच पॅनेलला मतदान करावे, असे आवाहन मतदारांना करीत आहेत. सर्वाधिक खर्च हा विकास सोसायटी मतदारसंघातच झाल्याचे सांगण्यात येत असून, एका उमेदवाराने किमान एक ते दोन कोटी रुपये खर्च केल्याचे समजते.

30 हून अधिक सोसायट्यांचे मतदार अज्ञातस्थळी

विकास सोसायटी मतदारसंघातील मतदारांची पळवापळवी होऊन मतदान फुटू नये, यासाठी हवेलीतील किमान 30 विकास सोसायट्यांच्या मतदारांना एका गटाने अज्ञातस्थळी हलविल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जेणेकरून एकगठ्ठा मतदान आपल्याच पॅनेलला कसे होईल, यावर भर देण्यात आला.

सौभाग्यवतींच्या प्रचारासाठी पती महाशय मैदानात

विकास सोसायटी मतदारसंघात महिला प्रवर्गातील लढतीही लक्षवेधी ठरणार आहेत. या गटात 2 जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने थेट लढत होत आहे. आपलीच पत्नी विजयी झाली पाहिजे, यासाठी त्यांचे पती भल्या पहाटेच घराबाहेर पडत आहेत. मतदार साखरझोपेतून उठण्यापूर्वीच घराबाहेरची बेल वाजत, 'पाव्हणं गुड मॉर्निंग' असे म्हणत मतदारांचेच एकप्रकारे उमेदवारच स्वागत करीत आहेत. चहाचे सोपस्कर पार पडून तुमच्या कोणत्या अडचणी आहेत, याची विचारपूस करून मतदानाचा सौदा पक्का केला जात असल्याचीही चर्चा आहे.

बुलेटपासून स्कूटी वाटपाच्या आश्वासनाची चर्चा

पुणे बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदारसंघात 713 इतके सर्वांत कमी मतदान असून, सर्वाधिक चुरस याच गटात आहे. या मतदारसंघात विजयी झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांना बुलेट ते महिला सदस्यांना स्कूटी वाटप करण्याचे आमिष दाखविण्यात आल्याची कुजबुज उघडपणे सुरू झाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या एका मताचा भाव अगदी 2 ते 3 लाखांपर्यंत फुटल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

अगदी 50 मतांसाठीही जेवणावळी

व्यापारी-अडते मतदारसंघात तर अगदी एकगठ्ठा 50 मतांसाठी जेवणावळीच्या पंगती झडत आहेत. गोडधोड जेवणाबरोबरच मतदारांसाठी तांबड्या-पांढर्‍या रश्श्यावर ताव मारून झाल्यावर आमच्याच पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन काही उमेदवारांकडून सुरू असल्याचे समजते. अशा जेवणावळी शहरातील विविध भागांत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news