पुणे : पैसा हरला, जनता जिंकली… काँग्रेस भवनातील सभेत सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

पुणे : पैसा हरला, जनता जिंकली… काँग्रेस भवनातील सभेत सर्वपक्षीय नेत्यांचा सूर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'निवडणुकीपूर्वी एकीकडे भरपूर पैसा होता, तर एकीकडे सर्वसामान्यांचे काम होते. या वेळी वाटत होते पैसा जिंकतो की काय? मात्र, विजय सर्वसामान्यांच्या कामाचा झाला अन् अखेर पैसा हरला, जनता जिंकली,' असे सूर काँग्रेस भवनात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या सभेत उमटले. कसबा विधानसभा पोट निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर काँग्रेस भवन येथे गुरुवारी (दि.2) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी, येथे आणि राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी भोर-वेल्ह्याचे आमदार व कसबा पोटनिवडणुकीचे निरीक्षक संग्राम थोपटे, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व अन्य उपस्थित होते.

शिवसेने संजय मोरे म्हणाले, 'सुरुवातीला कसब्याची पोटनिवडणूक ही पोटनिवडणूक नव्हतीच, ती 'नोट निवडणूक' होती. मात्र, जनतेने ते दाखवून दिले आणि आमचा विजय झाला.' राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणाले, 'दुसर्‍याच्या बापाचा फोटो आणि पक्षचिन्ह पळविणार्‍यांना जनता मतदान करत नाहीत, हे या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले. आता यापुढेही आमची महाविकास आघाडीची एकी कायम राहील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी आणि संपूर्ण राज्यातील भाजपने तडीपार वर्ग, व्यावसायिकांना प्रचारासाठी उतरवले.

त्याचसोबत गुंड, प्रशासन आणि जातिपातीचे राजकारण केले. मात्र, कसब्यातील सुजाण मतदारांनी या सर्वांना हद्दपार करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पसंती दिली. नागपूरच्या जनतेने 'रेशीम बागेतील' भाजप उमेदवाराचा पराभव केल्यानंतर आता कसब्यातील मतदारांनी 'मोती बागेतील'ही भाजप उमेदवाराचा पराभव करून भाजपच्या हुकूमशाही राजवटीला झुगारले आहे.'

काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे म्हणाले, 'आजचा विजय उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा विजय आहे. बाळासाहेब दाभेकर यांनी ऐनवेळी माघार घेतली, त्यांचे आभार. आज सर्वसामान्य माणूस जिंकला आहे. पण, मी अशा प्रकारच्या हातघाईच्या निवडणुकीची लढाई आतापर्यंत पाहिली नव्हती. जनतेने सर्वांना जागा दाखवून दिली आहे.' अरविंद शिंदे म्हणाले, 'पराजय पचवता येतो, विजय पचवणे अवघड असते. आम्ही तिन्ही पक्षांचे अध्यक्ष एकत्र राहून काम करू असे वचन देतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news