मम्मी, पप्पा मला तुम्ही दोघेही हवे आहात; 4 वर्षांच्या चिमुकलीने जुळवून आणला आई-वडिलांचा संसार
पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'मम्मी-पप्पा, मला तुम्ही दोघेही हवे आहात. आपण एकत्रच राहूयात; नाहीतर मी तुम्हाला छडीने मारेल. आत्ता माझा बर्थ डे येईल, तो आपण एकत्र साजरा करू आणि सर्वांना बिर्याणी खायला बोलावू,' हे काळजाला ठाव घेणारे शब्द बोलून चार वर्षांच्या चिमुरडीने आई-वडिलांचा तुटण्याच्या मार्गावर असलेला संसार पुन्हा जुळवून आणला.
प्रेमाच्या आणाभाका घेत अनुराग (वय 28) व प्रेरणा (वय 24) यांनी लग्नगाठ बांधली. तो झाडूखात्यात कामाला, तर ती धुणीभांडी करून संसार चालवित होती. या दरम्यान, त्यांना एक गोंडस मुलगी झाली. अनुराग दारू पिऊन मारहाण करतो, तसेच व्यवस्थित सांभाळत नसल्याच्या कारणावरून प्रेरणा लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्या चिमुरडीला घेऊन माहेरी निघून आली. मुलीच्या ओढीने अनुराग तिला भेटायला जात असे; मात्र त्याची भेट होत नव्हती. या दरम्यान, अनुराग याने अॅड. वैशाली चांदणे यांच्यामार्फत न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. यादरम्यान, अनुराव व प्रेरणाचे समुपदेशन करण्यात आले; मात्र ते दोघेही घटस्फोटावर ठाम होते.
किरकोळ कारणावरून घटस्फोटाचा हट्ट धरून बसलेल्या त्या दोघांच्या वकिलांनी त्यांना एकत्र बोलावले. यावेळी, त्यांची चार वर्षांची चिमुरडीही सोबत होती. यावेळी, मुलीच्या भवितव्याकडे बघण्याचे सांगत असतानाच त्या चिमुकलीने 'मम्मी-पप्पा मला तुम्ही दोघे हवा आहात. आपण एकत्रच राहूयात; नाहीतर मी तुम्हाला छडीने मारेल.
आत्ता माझा बर्थ डे येईल, तो आपण एकत्र साजरा करू आणि सर्वांना बिर्याणी खायला बोलावू,' असे बोलून आई-वडिलांच्या काळजाला हात घातला. याबाबत वकिलांनी चिमुकलीचे कौतुक करत तिच्या शब्दांचा विचार करण्याचे सांगताच त्या दोघांचेही मतपरिवर्तन झाले. 'आपण सर्वांना 'बर्थडे'ला बोलावू आणि बिर्याणी खायला घालू,' असे वडलांनी म्हणताच उपस्थितांना बाप-लेकीच्या विलक्षण प्रेमाचा अनुभव आला.
एरवी कौटुंबिक न्यायालयात मुलांच्या ताब्यासाठी वाद-प्रतिवाद होत असतात. मुलांचा ताबा वडिलांकडे राहणार की आईकडे याबाबत दोन्हीकडचे वकील न्यायालयात युक्तिवाद करत असतात. मात्र, घटस्फोटावर ठाम असलेल्या आई-वडीलांचे चार वर्षांच्या चिमुकलीने मतपरिवर्तन केले. कौटुंबिक न्यायालयात या स्वरूपाचे हे पहिलेच प्रकरण आहे.
– अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन.

