

पुणे : येथील मॉडेल कॉलनीतील शेठ हिराचंद नेमचंद दोशी स्मारक ट्रस्टच्या (जैन बोर्डिंग) वसतिगृह इमारतीसह असलेल्या सुमारे तीन एकर जागेचा खासगीकरणाने विकास करण्यास आमचा विरोध असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. एचएनडी ट्रस्टच्या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्तांमार्फत केलेल्या साठेखतास आम्ही आव्हान देणार असल्याचेही ते म्हणाले.(Latest Pune News)
राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो विद्यार्थी हे या ट्रस्टच्या जागेतील वसतिगृहात राहून विद्येच्या माहेरघरात शिकले आणि याच जागेत 65 वर्षे जुन्या असलेल्या भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराशी आमच्या भावना गुंतलेल्या आहेत. येथील वसतिगृह इमारत मोडकळीस आल्याचे कारण खरे नाही.
एचएनडी ट्रस्टच्या विश्वस्तांना आम्ही विनंती केली आहे की, जागा न विकता या हॉस्टेलच्या विकासासाठी, या ट्रस्टचे असलेले उद्देश साध्य करण्यासाठी, शैक्षणिक कामासाठी समाज म्हणून आम्ही पुढे येऊ. त्यासाठी आम्ही झोळी घेऊन भीक मागू आणि त्यातून पैसा उभा करू. मात्र, ऐतिहासिक जागा विकून परंपरा खंडित करू नका, झालेले साठेखत रद्द करा आणि ही वास्तू आहे तशी ठेवण्यात यावी, असा एकमुखी ठराव आजच्या बैठकीत आम्ही केला आहे. तसेच याबाबत चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत येथील जैन मंदिरात प्रथम राजू शेट्टी यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि त्यानंतर झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. या वेळी ॲड. योगेश पांडे यांच्यासह अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, ॲड. सुकौशल जिंतुरकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, याबाबत ट्रस्टच्या काही विश्वस्तांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची याबाबतची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
काय म्हणाले, शेट्टी
धर्मादाय आयुक्तांनी चुकीच्या पध्दतीने साठेखताला मंजुरी दिली.
ट्रस्टच्या उपविधीनुसार जागा विकण्यासंदर्भात विश्वस्तांना कोणताही अधिकार नाही.
साठेखताला हरकत घेऊन धर्मादाय आयुक्तांसमोर पुनर्विचार याचिका दाखल करणार.
300 पेक्षा अधिक वृक्षांची कत्तल शक्य असल्याने हरित लवादाकडे तक्रार करणार.
विश्वस्तांनी पुढे येऊन बिल्डरबरोबरचा करार रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे.
जैन बोर्डिंगमधील बैठकीत बोलताना राजू शेट्टी व उपस्थित नागरिक.