

पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त पुणे नवरात्रौ महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यक्रम होत आहेत.(Latest Pune News)
पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘स्वर समाज्ञीयाँ’ कार्यक्रमही रंगला. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका जयमाला शिलेदार यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. या वेळी संयोजक आबा बागूल यांनी जयमाला शिलेदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. राधिका अत्रेनिर्मित महिला गायिकांचा ‘स्वर समाज्ञीयाँ’ हा विशेष कार्यक्रम झाला. राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर यांनी विविध सुरेल गाणी सादर करीत मने जिंकली. या कार्यक्रमात अमन सय्यद, ओमकार पाटणकर, विशाल थेलकर, निशित जैन, केविन, अजय अत्रे, हर्षद गनबोटे, रोहित जाधव, अमित सोमण, राकेश जाधव यांनी साथसंगत केली. जयश्री बागूल, सतीश मानकामे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागूल, सागर बागूल उपस्थित होते.
महिलांचे सामूहिक स्तोत्रपठण
27 व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात 500 हून अधिक महिलांनी शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात सामूहिक श्रीसूक्तपठणाचे पाचवेळा आणि श्री विष्णू सहस्रनामाचे पाचवेळा आवर्तन केले. सुरुवातीला सर्व महिलांनी श्री लक्ष्मीमातेची सामूहिक आरती केली. सर्व सहभागी महिलांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात आल्या. सोनम बागूल व श्रुतिका बागूल उपस्थित होते.