पिंपरी : वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी फिरते क्लासरुम

पिंपरी : वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी फिरते क्लासरुम
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वीटभट्टी कामगार कामानिमित्त वारंवार स्थलांतर करतात. गाव बदलल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते. हीच बाब ओळखून पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी पोर्टेबल स्वरुपातील फिरते क्लासरुम सुरू करण्यात आले आहे. त्याचा सुमारे 300 ते 350 मुलांना फायदा होणार आहे. पुनावळे येथे वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी दोन फिरत्या क्लासरुमची सोय केली आहे. त्याचप्रमाणे, रावेत येथे एक फिरते क्लासरुम सुरू केले आहे. शेळकेवाडी (ता. मुळशी) येथे देखील क्लास रुम सुरू करण्यात आले आहे. माण, ताथवडे येथे देखील वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी फिरते क्लासरुम सुरू करण्यात येणार आहे. येरवड्यातील इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (आयएससी) या स्वयंसेवी संस्थेतर्फे कंपन्यांच्या 'सीएसआर' उपक्रमातंर्गत ही सोय करण्यात आली आहे.

कामगारांच्या मुलांसाठी 15 वर्षांपासून उपक्रम
खेड्यापाड्यापासून ते परराज्यातून हाताला काम आणि पोटाला अन्न मिळेल, या उद्देशाने दरवर्षी हजारो कामगार पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येतात. बांधकाम साइट किंवा वीटभट्टीवर मिळेल तिथे ते काम करतात. वीटभट्टीवरच्या मुलांना शाळेत कोठे घालायचे? शाळा सोडल्याचा किंवा जन्मदाखला कोठून आणायचा? असे प्रश्न असतात. एवढे करूनही भाषेचा अडसर जाणवतो. हीच बाब ओळखून 'आयएससी' या संस्थेतर्फे गेल्या 15 वर्षांपासून स्थलांतरितांच्या मुलांना शाळेत भरती करण्यासाठी व शाळेतील गळती थांबविण्यासाठी 'बाल शिक्षा' हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेच्या मदतीमुळे पंधरा वर्षांत आठ हजारांवर स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे.

'सीएसआर'अंतर्गत सहाय्य केले जावे
स्थलांतरित मुलांसाठी वीटभट्टीवर वर्ग भरवून शैक्षणिक व सामाजिक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न संस्थेकडून चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुनावळे येथे नुकतेच पोर्टेबल स्वरुपातील फिरत्या क्लासरुमचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या कार्यकारी संचालक मेधा ओक या प्रसंगी उपस्थित होत्या. वीटभट्टीवरील सर्व वर्ग पोर्टेबल बनविण्यासाठी सीएसआरअंतर्गत विविध कंपनी व संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच, या नावीन्यपूर्ण उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन ओक यांनी केले आहे. वीटभट्टीवर वर्ग चालविण्यासाठी कोरोना, पाऊस व चिखल, वर्गासाठी जागा न मिळणे, शाळा व वीटभट्ट्यांमधील लांब अंतर असे अनेक प्रश्न भेडसावत असतात. या समस्यांवर विचार करून आयएससीने पोर्टेबल क्लासरुम बनविण्याचे ठरविले. त्यानुसार, अद्ययावत वर्ग, सुरक्षित जागा यामुळे मुले आनंदी राहून पुढील शिक्षण घेतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news