

शिर्सुफळ : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या खासगी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गाळप हंगामानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ३,१०० रुपयांप्रमाणे रक्कम जमा केली होती. नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या आ. रोहित पवार यांचा कारखाना असल्याने दिवाळीत किमान १०० ते २०० रुपये प्रतिटन वाढीव रक्कम मिळेल, अशी शेतकऱ्यांना रास्त अपेक्षा होती. मात्र, कारखान्याकडून कोणतीही वाढीव रक्कम जमा न करता तोंडाला पाने पुसण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सहकार क्षेत्रातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदा 'गेटकेन' ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४०० रुपये दर दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोनेही याच धर्तीवर दर द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत प्रतिटन ३,४०० ते ३,५०० रुपये दर मिळाल्यासच ऊस उत्पादकांना दिलासा मिळू शकेल, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. आ. रोहित पवार यांना शेतकऱ्यांची ही वस्तुस्थिती समजेल, अशी अपेक्षाही शेतकरी बाळगून आहेत.
सध्याचे दुष्काळाचे सावट, रासायनिक खते-औषधांच्या वाढलेल्या किमती, मजुरी आणि शेती मशागतीचा खर्च यांमुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत बारामती ॲग्रोकडून कमी दर मिळत असल्याने संकटात आणखी भर पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बारामती ॲग्रो प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रतिटन ३,४०० ते ३,५०० रुपये दर द्यावा, तसेच मागील गळीत हंगामातील दरातील तफावत भरून काढण्यासाठी वाढीव रक्कम द्यावी, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून होत आहे.
दरम्यान, या संदर्भात कारखान्याच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
माळेगाव कारखान्याच्या ऊसतोडणी टोळ्या बारामती ॲग्रोच्या कार्यक्षेत्रात तुलनेने कमी प्रमाणात येतात. शिर्सुफळ हे गेटकेन क्षेत्र असल्याने शिर्सुफळ, साबळेवाडी, पारवडी, सिद्धेश्वर निंबोडी, गाडीखेल आणि कटफळ परिसरातील शेतकऱ्यांना माळेगावच्या ऊसतोडणी कामगारांची मोठी प्रतीक्षा करावी लागते. तोडणीला विलंब होत असल्याने अनेकदा नाइलाजास्तव ऊस बारामती ॲग्रो कारखान्याला द्यावा लागतो. शेतकऱ्यांच्या याच हतबलतेचा आणि अडचणीचा गैरफायदा बारामती ॲग्रोने घेऊ नये, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
"यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. सहकारी साखर कारखान्यांनी उच्चांकी दर जाहीर केले आहेत. आ. रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यभरात आंदोलने करतात; मात्र त्यांच्याच कारखान्यात शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर दिला जात आहे. त्यामुळे बारामती ॲग्रो साखर कारखान्याने वाढीव दर देऊन यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी."
— दीपक आटोळे, शेतकरी, शिर्सुफळ