खेड: खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम दर्जाहीन होत आहे. या कामाकडे जिल्हा परिषदेच्या व खेड पंचायत समितीच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याने ठेकेदार कामात कुचराई करीत असून, काम निकृष्ट व दर्जाहीन केले जात आहे.
त्यात सुधारणा झाली नाही तर वेळप्रसंगी काम थांबवण्यात येईल आणि जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) खेडचे आमदार बाबाजी काळे व शिवसेना जिल्हाप्रमुख (एकनाथ शिंदे गट) भगवान पोखरकर यांनी दिला आहे. (Latest Pune News)
खेड पंचायत समितीच्या राजगुरुनगर येथील प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सुधारित तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम 2 वर्षांपूर्वी सुरू झाले. सत्तासंघर्षात ते धिम्या गतीने सुरू आहे. हे काम तिसर्या मजल्यापर्यंत झाले आहे. तिसर्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र त्या खालील स्लॅब केल्यानंतर त्याला पाणी मारले नसल्याने त्याला चिरा गेल्या आहेत.
त्यातून खाली पाण्याची गळती होत आहे. पिलरमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. विटा, वाळू कमी दर्जाची वापरली जात आहे. स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर ही बाब पुढे आली आहे. हे काम अत्यंत दर्जाहीन पद्धतीने होत असून आगामी काळात इमारतीचे आयुष्यमान दर्जाहीन कामामुळे कमी होणार आहे.
या कामाकडे शासकीय अधिकार्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. या कामाची रविवारी (दि. 21) आमदार बाबाजी काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तालुकाप्रमुख नीलेश पवार यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला.