Crime against minor girl
पौड: मुळशी धरण भागातील वळणे (ता. मुळशी) येथे 15 वर्षीय मतिमंद मुलीवर घरात शिरून अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी (दि. 13) दुपारी उघडकीस आला. शंकर मारुती साबळे (रा. वळणेवाडी, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या नराधमास ग्रामस्थांनी पकडून चोप दिला. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी मतिमंद असून, 15 वर्षांची आहे. पीडिता आपल्या कुटुंबासह वळणे गावच्या वाडीत राहते. रविवारी दुपारी आरोपी शंकर साबळे हा पीडितेच्या घरी गेला. त्याने मुलीवर अत्याचार केला. (Latest Pune News)
या वेळी पीडितेने विरोध केल्यावर त्याने तिच्या गळ्यावर, पोटात, पाठीवर, बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून दमदाटी केली. या वेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, आरोपीचे कृत्य उघडकीस आल्यावर ग्रामस्थांनी आरोपीस मारहाण केली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आरोपीच्या नातेवाइकांचे गावात प्रस्थ आहे. आरोपीस मारहाण करणार्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या शिक्षेसाठी पौडला मोर्चा
या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पौड येथे मोर्चा काढण्यात आला. आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणार्या आरोपी शंकर साबळे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या मोर्चाला आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.