तळेगाव स्टेशन :पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे परिसरात अल्पवयीन दुचाकी, चारचाकी वाहन चालकांचा सुळसुळाट झाला असुन त्यांना आवरणे आवश्यक आहे. त्यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना तर नसतोच परंतु काही अल्पवयीन दुचाकी चालक अनेक वेळा ट्रिपलसीट वाहन तळेगाव शहरात व परिसरात चालवितात. यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालतातच परंतु दुस-या वाहनचालकांचा, नागरिकांचा, पादचा-यांचा जीव धोक्यात घालतात.
काहीजण चारचाकी देखील चालवितात.हे वाहन चालक तळेगाव शहरात,परिसरातील अनेक ठिकाणांबरोबरच शाळा,हायस्कुल कॉलेज, भरताना आणि सुटताना अल्पवयीन वाहन चालक दिसतात. तळेगाव दाभाडे परिसरात अनेक अपघात होतात याबाबत अनेक कारणांपैकी अल्पवयीन वाहनचालक हे एक कारण असू शकते. याबाबत पालकांनी आपल्या पाल्यावर काटेकोरपणे नजर ठेवून त्यांना समज देणे आवश्यक आहे.
याबाबत वाहतूक पोलीसांनी आणि तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी दखल घेणे आवश्यक आहे. काहीजण वाहनांचे सायलन्सर मध्ये विशिष्ट बदल करुन वाहनांचा मोठा आवाज दिवसा, रात्री-अपरात्री काढतात यामुळे वृध्द नागरिक, विद्यार्थी यांना त्रासदायक होते याबाबतही दखल घ्यावी अशीही नागरिकांची मागणी आहे.