वाल्हे: दूध व्यवसाय आला अडचणीत ; दुधाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र

वाल्हे: दूध व्यवसाय आला अडचणीत ; दुधाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र
Published on
Updated on

समीर भुजबळ : 

वाल्हे (पुणे ) : मागील दोन महिन्यांपासून खासगी व सहकारी दूध संघाने, शेतकर्‍यांच्या दूध खरेदी दरात तब्बल साडेसहा रुपयांनी घट केली आहे. परिणामी, दूध उत्पादक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढावत आहे. दुधाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचा घटक आहे. तथापि दुधास योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र, मध्यंतरी वाढलेल्या दरामुळे तरुणवर्गही दूध व्यवसायाकडे वळला आहे. मागील 16 -17 महिन्यांपासून गाई, म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, शेतकर्‍यांसाठी हे "अच्छे दिन" मानले जात होते.

शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला होता. मात्र, पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दूध दरात साडेसहा रुपयांनी घसरण झाली आहे. पशूखाद्याचे दर वाढत असताना, दुधाचे वाढलेले दर दुधाला चांगली मागणी असतानाही कमी होत आहेत.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुधाला प्रतिलिटर 38 रुपये दर मिळाला होता. यामुळे तरुणाई दूध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका दूध दर कपातीमुळे बसणार आहे. नव्याने धंद्यात उतरलेला तरुणवर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी असूनही, उन्हामुळे साधारण 10 टक्के दूध उत्पादनात घट होऊनही खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदी दर आता 31 रुपये 50 पैसे केल्याने संकट वाढले आहे.

अगोदरच चाराटंचाईने त्रस्त
मान्सूनपूर्व व मान्सूनचा पाऊस अद्यापपर्यंत न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. ऊस व मका, कडवळ आदी चार्‍याची पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे. हिरवा चार्‍यासाठी पशुपालक गुरांना घेऊन इतरत्र फिरत आहेत. यामध्येच दूध दरात घट होत असून, दूध व्यवसाय जिकिरीचा होत आहे.

दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचा आहे. तथापि दुधास योग्य भाव मिळत नसल्याने, दुग्धोत्पादक अडचणीत असून, दुधाचा उत्पादन खर्चदेखील सुटत नाही. सतत तोट्यामुळे दूध व्यवसाय बंद करण्याच्या मनःस्थितीत आहेत. दुग्धोत्पादकांना योग्य दरासाठी दुधाला हमीभाव व अनुदान द्यावे.
                                                – तानाजी पवार, दूध उत्पादक शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news