अवसरी घाट परिसरात वाढतय ‘मेया वाकी’

अवसरी घाट परिसरात वाढतय ‘मेया वाकी’
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जपान तंत्रज्ञानाच्या धर्तीवर मोठे वृक्ष, झाडे, झुडपे यांच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळविण्याची आणि झटपट वाढीची स्पर्धा लावणारे ' मेया वाकी' हे घनदाट जंगल अवसरी घाटात (ता. आंबेगाव) तयार होत आहे. केवळ दोन एकरमध्ये फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, देशी वृक्ष अशा तब्बल 93 विविध प्रकारच्या जातींचे सुमारे 24 हजार वृक्ष, झाडे, झुडपे येथे वन विभागाने लावली आहेत. जपानच्या धर्तीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेला हा पहिलाच घनवन प्रकल्प आहे.

याबाबत वन परिमंडळ अधिकारी एस.एल.गायकवाड यांनी सांगितले की, जुन्नर वन परिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत आंबेगाव तालुक्यात घोड प्रकल्प वन विभागामार्फत अवसरी घाट परिसरात वन विभागाच्या दोन एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अटल आनंदवन घनवन प्रकल्पांतर्गत जपानच्या धर्तीवर एक मीटरमध्ये दोन फुटांच्या अंतरावर तीन झाडांची लागवड केली जाते.

या तीन झाडांमध्ये एक मोठे देशी वृक्ष, एक झुडूपवर्गी व एक त्याहून कमी वाढणारी फुलझाडे, औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. दोन एकरमध्ये तब्बल 93 विविध प्रकारच्या 24 हजार वनस्पती लागवड करण्यात आली आहे. मुरबाड क्षेत्र असलेल्या या परिसरात जंगलाची वाढ चांगल्या पध्दतीने होण्यासाठी मातीची प्रत वाढावी, वृक्ष, झाडाझुडपांच्या वाढीसाठी योग्य पोषणमूल्य मिळावे म्हणून वृक्षलागवडीपूर्व मातीमध्ये शेणखत, उसाची मळी, पालापाचोळा अशा विविध प्रकारच्या सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर करण्यात आला.

त्यानंतर वृक्षलागवड झाल्यानंतर मल्चिंगसाठी सोयाबीनचा भुस्सा व उसाच्या पाचटाचा उपयोग करण्यात आला. मेया वाकी जंगलामध्ये शतावरी, आंबा, पेरू, चिकू, आवळा आदी झाडे, वड, पिंपळ, चिंच, जांभळ यांसारखी मोठ्या प्रमाणात देशी वृक्षलागवड करण्यात आली आहे.

जपानने हे मेया वाकी तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये एक मीटरमध्ये एक फुलझाड, एक मध्यम वाढणारे व एक मोठे वृक्ष अशी लागवड केली जाते. जगण्यासाठी सूर्यप्रकाश मिळविण्याची स्पर्धा या झाडांमध्ये लागते व त्यांची झपाट्याने वाढ होते. अवसरी घाट परिसरात पावसाळ्यात झाडे लावल्याने त्यांची चांगली वाढ झाली आहे.

                                            – प्रदीप रौधळ, वन परिक्षेत्र अधिकारी, खेड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news