पुणे : आम्ही पाणीकपात सुचविलेलीच नाही; हवामान विभागाने केला खुलासा

पुणे : आम्ही पाणीकपात सुचविलेलीच नाही; हवामान विभागाने केला खुलासा

पुणे : आम्ही महापालिकेला अल निनोमुळे पाणीकपात करा, असे सुचविलेले नाही. उलट यंदा उन्हाळ्यात गतवर्र्षीच्या तुलनेत खूप जास्त पाऊस झाला आहे. तसेच धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे, असे मत पुणे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी दै. 'पुढारी'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. पुणे महापालिकेने 18 मेपासून पाणीकपात सुरू केली आहे. ती करताना त्यांनी हवामान विभागाने अल निनोमुळे यंदा पाऊस उशिरा येणार असल्याचे कारण दिले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वेधशाळेतील हवामान विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांची भेट घेतली असता त्यांनी हा खुलासा केला आहे.

अल निनोचा संबंधच येत नाही…

कश्यपी म्हणाले की, अल निनोचा संबंध पाणीकपातीला लावता येणार नाही. कारण, अल निनो सध्या खूप कमकुवत आहे. तो ऑगस्टनंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे. शिवाय, हवामान विभागाने यंदा 96 टक्के मान्सून बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. यापूर्र्वी अनेकवेळा असे झाले आहे की, अल निनो सक्रिय झालेला असतानाही पाऊस भरपूर आलेला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आम्ही तशी कोणतीही सूचना महापालिका प्रशासनाला केलेली नाही.

अल निनो ही संकल्पना ग्लोबल…

कश्यपी यांनी विस्ताराने अल निनो ही संकल्पना समजावून सांगितली. ते म्हणाले की, अल निनो ही संकल्पना ग्लोबल आहे. परिणाम झालाच, तर जगावर एकसारखा होतो. तो पुण्यात किती व कसा राहील, हे सांगता येत नाही. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अल निनोचा प्रभाव सौम्य राहील. त्यामुळेच तर देशात मान्सून बरसण्याचा अंदाज 96 टक्के (4 टक्के कमी-अधिक) असा दिला आहे. 96 टक्के म्हणजे सामान्य पाऊस. कमी नाही आणि जास्तही नाही.

यंदा उन्हाळ्यात 61 मिमी पाऊस…

यंदाच्या उन्हाळ्यात शहरात 61 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांत शहरात इतका पाऊस मार्च व एप्रिलमध्ये झालेला नव्हता. तसेच धरणांतही पुरेसे पाणी शिल्लक आहे. उलट मागच्या वर्षी धरणात यंदापेक्षा कमी पाणी होते. यंदा तशी परिस्थिती नाही, असेही कश्यपी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news