

शिवाजी शिंदे
पुणे: भारताच्या ग्रामीण सांस्कृतिक वैविध्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेरा गांव मेरी धरोहर’(एम.जी.एम.डी.) हा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध राज्यातील सुमारे 6 लाख 50 हजार गावांचा सांस्कृतिक वारसा एका डिजिटल पोर्टलवर(एम.जी.एम.जी.पोर्टल) संग्रहित केला जाणार आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम 27 जुलै 2023 रोजी सुरू करण्यात आला. तो राष्ट्रीय सांस्कृतिक मानचित्रण मिशन अंतर्गत राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील सुमारे 6 लाख 50 हजार गावांचा सांस्कृतिक वारसा एका डिजिटल पोर्टलवर संग्रहित केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक गावाच्या परंपरा, लोकजीवन, सामाजिक सलोखा, इतिहास तसेच अमूर्त व मूर्त सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती समाविष्ट असेल.लोकपरंपरा, नृत्य, संगीत, सण-उत्सव, पारंपरिक खेळ, खाद्यसंस्कृती, पोशाख, कला-शिल्प, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, किल्ले तसेच विविध जाती-समुदायांच्या परंपरा व आठवणींचे दस्तऐवजीकरण या उपक्रमात करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून गावागावांतून ही माहिती संकलित करून ती डिजिटल पोर्टलवर सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे ग्रामीण सांस्कृतिक वारसा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहणार आहे. ग्रामीण भागात सांस्कृतिक पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. तसेच गावकर्यांमध्ये त्यांच्या परंपरा व इतिहासाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.
भारतातील सर्व राज्याच्या गावामध्ये सन 2025-26 पर्यंत सुमारे 4 लाख 70 हजार गावांची सांस्कृतिक माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. तसेच हा उपक्रम सुरूच राहणार आहे.दरम्यान पुढील टप्प्यात उर्वरित गावांचाही समावेश करण्यात येणार आहे .म्हणजेच ‘मेरा गांव मेरी धरोहर’ हा उपक्रम प्रत्येक गावाची सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक ओळख डिजिटल स्वरूपात जतन करून ती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न ठरणार आहे.
राज्यातील सुमारे 45 हजाराहून अधिक गावामध्ये ‘ मेरा गाव मेरा धरोहर’ या उपक्रमाची सुरूवात
भारत सरकारच्या पंचायत राज व सांस्कृतिक विभागाच्या उपक्रमानुसार राज्यातील सर्व गावामध्ये ‘ मेरा गाव मेरा धरोहर’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर राज्यातील सहा पाच ‘प्रवीण प्रशिक्षकांना’ प्रशिक्षण देण्यात आले होते. आता या प्रशिक्षकांच्या सहकार्याने पुण्यातील यशदा येथे राज्यातील जिल्हास्तरावरील ग्राम विकास विभागात कार्यरत असलेल्या निवडक अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता हेच प्रशिक्षकस्थानिक पातळीवरील ग्रामविकास अधिकारी,संरपंच, काही नागरिक यांना ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये लोकसहभाग मह्त्वाचा असणार आहे.नागरिकांच्या मार्फत जमा करण्यात आलेली माहिती ‘मेरा गाव मेरी धरोहर’ या पोर्टलवर भरली जाणार आहे. त्यानंतर 26 जानेवारी रोजी ग्रामसभेत या माहितीचे वाचन करण्यात येणार आहे.
गावातील याबाबीचा असेल ‘मेरा गाव मेरा धरोहर’या उपक्रमात समावेश
पंचायत किंवा गावाची ओळख:
ग्रामपंचायतीचा भौगोलिक,ऐतिहासिक व प्रशासकीय परिचय,गावाची निर्मिती कशी झाली, लोकसंख्या, सामाजिक रचना आणि वैशिष्ये.
गावाचे सांस्कृतिक महत्त्व:
गावाची सांस्कृतिक ओळख, परंपरा, लोकजीवन, सामाजिक सलोखा व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ग्रामसभेची भूमिका
मूर्त वारसा:पुरातत्वीय स्थळे व स्मारक रचना:
गावातील ऐतिहासिक स्मारके,देवळे, किल्ले, वाडे, पुरातत्वीय अवशेष तसेच त्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची आवश्यकता
अमूर्त सांस्कृतिक प्रथा व परंपरा:
लोकरिती,रूढी, सण, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, बोलीभाषा व पारंपरिक ज्ञान प्रणाली यांचे जतन
कार्यक्रम ,उत्सव, मेळे व यात्रा
गावस्तरावर साजरे होणारे धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक उत्सव, मेळे, व यात्रा तसेच त्यांचे सामाजिक -सांस्कृतिक महत्व.
याशिवाय गावातील लोककला,कारागीर,शिल्पकार, वादक,वाद्ये, कलाकार, व परंपरागत व्यवसाय करणा-या व्यक्तीची नोंद, ग्रंथालये, वाचनालये, सांस्कृतिक भवन, देवस्थाने, मठ, सभागृहे, पारंपरिक वस्तु, हस्तकला, दागिने, साधने, चित्रे, ग्रामस्तरावर सांस्कृतिक वारशाची नोंदणी,माहिती संकलन, अभिलेखीकरण, डिजिटल दस्ताऐवजीकरन अद्यावत करणे,तसेच सांस्कृतिक घटकांचा 10 ते 12 मिनिटांचा व्हिडिओ करून तो एम.जी.एम.डी.पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.
पंचायत राज मंत्रालय, व सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने देशातील सर्व गावांचा सांस्कृतिक वारसा डिजीटल स्वरूपात जतन करणेसाठी मेरा गाव मेरी धरोहर हे राष्ट्रीय अभियान राबविणेत येत आहे. यामुळे गावांचे महत्व, तेथील वारसा,लोकसंस्कृती, कला जगात पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच 26 जानेवारीच्या ग्रामसभेत गावच्या सांस्कृतिक वारसा, परंपरा यांना उजाळा मिळणार आहे.तसेच प्रत्येक गावचा सांस्कृतिक वारसा जगासमोर येण्यास तसेच तो जतन करणेसाठी मदत होणार आहे.पर्यटन वाढीस देखील चालना मिळणार आहे.
प्रकाश कळसकर-राज्यस्तरीय प्रविण प्रशिक्षक- मेरा गाव मेरा धरोहर उपक्रम