

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: 'सोमेश्वर' कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 10 गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यास स्थानिक शेतकरी सभासदांनी विरोध दर्शविला असून, सहकार विभाग व उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. प्रसंगी शेतकर्यांसोबत आंदोलन करण्याची तयारी असल्याची माहिती भाजपचे नेते दिलीप खैरे यांनी दिली. याबाबत सभासदांशी बैठका सुरू आहेत. 'सोमेश्वर'ने हा निर्णय घेण्याअगोदर सभासदांशी चर्चा करण्याची गरज होती. मात्र, राजकीय व्यवस्था व्हावी, यासाठी हा निर्णय सभासदांवर लादल्याची टीका खैरे यांनी केली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निम्म्यापेक्षा अधिक जिराईत क्षेत्र आहे. बारामतीचे बहुतांश जिराईत क्षेत्राची नाळ स्थापनेपासून 'सोमेश्वर'शी जोडलेली आहे. यामधील 'माळेगाव'च्या अंतराच्या दृष्टीने जवळ असलेली अंजनगाव, जळगाव क. प., जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल, भिलारवाडी, नारोळी, कोरोळी, कार्हाटी, खराडेवाडी या 10 महसुली गावांकडे नजर आहे. 'सोमेश्वर'चे 1100 सभासद असलेल्या या दहा गावांतून एकाही सभासदाने अथवा गावच्या नागरिकांनी कार्यक्षेत्र हस्तांतराची मागणी साखर आयुक्तांकडे अथवा 'सोमेश्वर'कडे केलेली नाही.
असे असताना ही गावे माळेगावला 'उसासाठी' हवी आहेत की 'निवडणुकीची राजकीय सोय' म्हणून हवी आहेत, अशी चर्चा सभासदांमध्ये आहे. 'माळेगाव'ने ही 10 गावे समाविष्ट करण्यास 'नाहरकत' द्यावी, असे पत्र सोमेश्वर कारखान्याला दिले आहे. 'सोमेश्वर'च्या संचालक मंडळाने सभासदांनी या विषयावर 29 सप्टेंबरला होणार्या वार्षिक सभेत निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे.
यावर सभासद हा विषय हाणून पाडायचा की मान्य करायचा, याबाबतचा निर्णय घेणार आहेत. या सभेत दहा गावांमधील सभासदांनाही आपल्या भूमिका मांडता येणार आहेत. दरम्यान, 'माळेगाव'नेही पोटनियमात दुरुस्ती करीत नवीन 10 गावांचा समावेश करण्यासंदर्भातील ठराव स्वतःच्या 29 सप्टेंबरच्याच वार्षिक सभेत ठेवला आहे. यावर काय निर्णय होणार, हे येत्या 29 सप्टेंबरला समजणार आहे.
वेळ आल्यास आंदोलन करणार
दहा गावांच्या समावेशासंदर्भातील ठराव वार्षिक सभेपुढे मांडला जाणार आहे. 'माळेगाव'च्या या मागणीसंदर्भात 'सोमेश्वर'च्या कारभार्यांनी कुठलाही निर्णय न घेता हा विषय सभासदांच्या कोर्टात मांडला आहे. 'माळेगाव'च्या या वक्रदृष्टीमुळे या 10 गावांतील सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे. दिलीप खैरे यांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.