‘सोमेश्वर’च्या सभासदांनी बाहेर ऊस देऊ नये; अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे आवाहन

‘सोमेश्वर’च्या सभासदांनी बाहेर ऊस देऊ नये; अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे आवाहन
Published on
Updated on

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : 'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रात गरजेइतकी मुबलक तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे सभासदांच्या नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. त्यामुळे सभासद शेतकर्‍यांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये, असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे. याबाबत जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, 'सोमेश्वर'ने चालू गळीत हंगामात आजअखेर 7 लाख 9 हजार मेट्रिक टनाचे गाळप केले असून, सरासरी 11.07 टक्के साखर उतारा राखत 7 लाख 83 हजार 800 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधून आजअखेर 4 कोटी 91 लाख 57 हजार 195 युनिटची वीजनिर्मिती केली असून, 2 कोटी 74 लाख 40 हजार 244 युनिटची वीज विक्री केलेली आहे. कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातून 41 लाख 73 हजार 753 लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेत 19 लाख 1 हजार 872 लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

सोमेश्वर कारखाना दररोज सरासरी 7600 मेट्रिक टन गाळप करीत असून, गेल्या महिनाभरापासून सरासरी 8500 मेट्रिक टन गाळप होत असल्याने संपूर्ण नोंदविलेला ऊस एप्रिलअखेर गाळप होईल. कारखान्याकडे सभासद व बिगरसभासदांचे एकूण 40 हजार 792 एकर ऊसक्षेत्र नोंदविले असून, त्यापैकी 19 हजार 844 एकर आडसाली ऊसक्षेत्र आहे. 19 जानेवारीअखेर 6 लाख 56 हजार 828 मेट्रिक टन आडसाली उसाचे गाळप झालेले आहे.

उर्वरित आडसाली उसातून 1 लाख 90 हजार मेट्रिक टन गाळप अपेक्षित असून, येत्या महिनाभरात आडसाली संपविण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दहाव्या व अकराव्या महिन्यातील खोडवा उसाचे गाळप सुरू असून, दहाव्या महिन्यातील 10001 व 86032 या व्हरायटींना तोडी मिळणार आहेत. कारखान्याकडे एकूण नोंदीपैकी बेणे व इतर वजा जाता गाळपासाठी 22 हजार 683 एकर ऊसक्षेत्र शिल्लक असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.

आतापर्यंत तुटलेल्या उसाला पहिला हप्ता प्रति मेट्रिक टन 2800 रुपयांप्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग करीत असून, उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम असल्याने सभासदांनी इतरत्र ऊस न देता कारखान्यातच गाळप करावा. 2800 रुपयांप्रमाणे ऊसबिल सभासदांना देत असलो, तरी अंतिम दराबाबत 'सोमेश्वर' इतर कारखान्यांपेक्षा कमी राहणार नसल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

कारखान्याची विस्तारवाढ पूर्ण झाली असून, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे. डिस्टिलरी प्रकल्पाची विस्तारवाढ प्रस्तावित आहे. या सर्वांसाठी स्व:गुंतवणूक करणे गरजेचे असून, यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेत ऊसक्षेत्राच्या प्रमाणात एक एकर ऊसक्षेत्रासाठी एक भाग, या प्रमाणात शेअर्स रक्कम कपात करीत आहोत.

पोटनियमानुसार 10 गुंठे ऊसक्षेत्रासाठी 1 भाग, असा नियम असतानाही 'सोमेश्वर' एक एकर ऊसक्षेत्राच्या प्रमाणात एका भागाची रक्कम कपात करीत असून, ही रक्कम कपात करीत असताना धोरणानुसार रोखीने अथवा ऊसबिलातून किंवा सोसायटीमार्फत मध्यम मुदतीचे कर्ज उपलब्ध करून ही रक्कम मे महिन्यापर्यंत कपात करीत आहोत. भविष्याचा विचार करता सर्वच कारखाने शेअर्सच्या प्रमाणात गाळपास ऊस आणण्याची शक्यता नाकारता येत नसून ऊसक्षेत्राच्या प्रमाणात आपले शेअर्स असणे योग्य राहणार असल्याचे जगताप म्हणाले.

काही सभासद व शेतकरी यांनी वाहनमालक व तोडणी कामगार ऊसतोडणीसाठी पैशाची मागणी करीत असल्याचे कारखाना प्रशासनास कळविले आहे. वाहनमालक किंवा ऊसतोड मजूर पैसे मागून नाहक त्रास देत असतील, तर लेखी तक्रार कारखान्याकडे करावी. याची शहनिशा करून त्यांच्या बिलातून पैसे वसूल करून ते शेतकर्‍यांना परत दिले जातील.
                                                               – पुरुषोत्तम जगताप,
                                                         अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news