या मंदिरात हनुमानाच्या साक्षीने व्हायच्या क्रांतिकारकांच्या बैठका..!

या मंदिरात हनुमानाच्या साक्षीने व्हायच्या क्रांतिकारकांच्या बैठका..!
Published on
Updated on

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा :  ब्रिटिश राजवटीत दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुरातन मारुती मंदिर तसेच वरच्या आळीतील लष्कर मारुती मंदिर अजूनही क्रांतिकारकांच्या कार्याची साक्ष देत आहेत. ब्रिटिश काळात याच मारुती मंदिरात हनुमानाच्या साक्षीने क्रांतिकारकांच्या बैठका व्हायच्या, आंदोलनाच्या दिशा ठरायच्या. या मारुती मंदिराचा उपयोग स्वातंत्र्यलढ्याकरिता केला जायचा.

पूर्वी ब्रिटिशच्या  काळात दापोडीचा उल्लेख हा मुंबई प्रांताची राजधानी म्हणून केला जात असल्याचे येथील वयस्कर ग्रामस्थ सांगतात. ब्रिटिशकाळात दापोडी गावामध्ये ब्रिटिश गव्हर्नर हाऊस होते. या गव्हर्नर हाऊसमधून त्याकाळी सहा जिल्ह्यांचे काम चालायचे. दापोडी गावाला इंग्रजांच्या वास्तव्यामुळे जवळपास छावणीचे स्वरूप असायचे. त्यामुळे इंग्रजाच्या दबावाला न जुमानता दापोडी गावातून स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वधर्मीय जहाल आणि मवाळ मतवादी क्रांतिकारकांचा मोठ्या संख्येने सहभाग असायचा.

पुण्यात घडणार्‍या घटनांची पाळमूळ ही दापोडी गावात सापडायची. एखादा हल्ला, अगर आंदोलने, मोर्चे होण्याआधी क्रांतिकारकांकडून महत्त्वाच्या दिशा, बैठका, निरोप या मारुती मंदिरातून यायचे.दापोडी गावाला इंग्रजाचा लष्कर वेढा असतानादेखील दापोडीचे क्रांतिकारक रामभाऊ लक्ष्मण काटे, देविचंद बाफना, चंद्रभान लुंकड, शेख चाँद भाई, भोयी समाजाचे कोंडिबा तिकोने, रामोशी समाजाचे आणि कीर्तनकार विठ्ठल जाधव अशा धाडशी क्रांतिकारकांच्या ब्रिटिशांच्या विरोधात कारवाया चालायच्या, त्यात त्यांना यशदेखील मिळायचे. मारुती मंदिर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या कामाची स्रोत असायचे.

स्वातंत्र्याची साक्ष देणारे मारुती मंदिर पूर्वी कौलारू होते. आता काळानुरूप बदल होत गेला. मारुती मंदिराचा आता जयाजी काटे पाटील यांनी ट्रस्ट केला. सध्या या मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव तसेच वर्षभरचे कार्यक्रम राबवण्यासाठी तानाजी काटे, अरुण काटे, तुकाराम आणि सुदाम काटे स्थानिक गावकरी कष्ट घेतात.

मंदिर क्रांतिकार्याचे केंद्र
अध्यात्मिक बाजू लक्षात घेत मारुती मंदिरात त्याकाळी आरती भजन होण्याकरिता ब्रिटिशांचा विरोध नसायचा. उलट या गोष्टीचा फायदा घेत क्रांतिकारी गट कारवाई करण्यासाठी मारुती मंदिरात एकत्र यायचे. एखाद्या हल्ल्याचा निरोप क्रांतिकारक शिदोरी घेत कोणतेही वाहन नसतानाप्रसंगी पायी चालून काटे, पिंपळे गुरव, सांगवी गावात पोहोचायचे.

टॉवर उद्ध्वस्त केला…
थेरगाव, चिंचवड येथील हायटेंशन टॉवर पाडण्याचे काम दापोडीतील क्रांतिकारकांनी धाडसाने केले होते. यात जवळपास शंभर जणांचा सहभाग असल्याची माहिती दापोडी गावचे अभ्यासक विलास काटे, प्रकाश काटे, इतिहासकार सुभाष बोधे यांनी दिली. आजही दापोडीत क्रांतिकारकांचे वंशज आहेत. यात रामभाऊ काटे, बाफना, कोंडिबा तिकोने, शेख चाँद भाई आणि लुंकड यांच्या वंशजांचा समावेश आहे.
..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news