

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून मिळकतकरात देण्यात येणार्या 40 टक्के सवलतीसंदर्भात आज (शुक्रवार) मुंबईत मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक होणार आहे. या बैठकीत दिलासा मिळणार का ? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. तसेच पीएमपीएमएलसंदर्भातही मुंबईत बैठक होणार आहे. गेल्या आठवड्यात आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे यांनी मिळकतकराच्या सवलतीसंदर्भातील विषय विधिमंडळात उपस्थित केला होता. तसेच शहर भाजपचे शिष्टमंडळही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्या वेळी बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, करआकारणी आणि संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख उपस्थित राहणार असल्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बांधकामांना शास्तिकर माफ केल्यानंतर पुण्यातून मिळकतकरातील बंद करण्यात आलेली 40 टक्के सवलत पुन्हा मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे . कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधिमंडळात ही मागणी करताना, पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकतकर माफ करावा, अशी मागणी लक्षवेधीद्वारे केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिळकतकरातील सवलत कायम ठेवण्याचा निर्णय सत्ताधार्यांकडून घेतला जाऊ शकतो.
…तरीही सवलत केली रद्द
महालेखापाल कार्यालयाने करपात्र मूल्यातून 15 टक्के वजावट घेण्यास आक्षेप घेतला होता. या समितीच्या शिफारशींनुसार राज्य सरकारने 28 मे 2019 रोजी महापालिकेला पत्र पाठवले असून, त्यामध्ये 15 टक्क्यांऐवजी दहा टक्के रक्कम करपात्र मूल्यातून वजा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये कोठेही 40 टक्के सवलत रद्द करण्यास सांगण्यात आले नव्हते. तरीही ही सवलत रद्द करण्यात आल्याचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी सांगितले.