पिंपरी : ‘वायसीएम’मधील औषध दुकानास 8 महिन्यांपासून टाळे, सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड
पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी महासंघाची फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक पार पडली. या निवडणुकीतील निकालाचा मुद्दा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. निवडणुकीतील दोन गटांतील वादाचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसला आहे. महासंघाच्या वादामुळे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील जेनेरिक औषधांचे दुकान गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे.
पालिकेतील कर्मचारी महासंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली. पालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महासंघाच्या निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी दोन दिवस लागले. या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष असलेले अंबर चिंचवडे पॅनेलवर माजी अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या पॅनेलने मात करत महासंघावर ताबा मिळवला. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये झिंजुर्डे पॅनेलने बाजी मारल्याने आजी-माजी पदाधिकार्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याची धग अद्याप कायम आहे.
त्याचा परिणाम म्हणून वायसीएम रुग्णालयातील जेनेरिक औषधाचे दुकानास टाळे आहे. ते दुकान उघडण्यासाठी आजी-माजी पदाधिकार्यांमध्ये वादही झाला होता. दुकान बंद असल्याने तेथे दाखल झालेल्या सर्वसामान्य रुग्णांना तेथून औषधे खरेदी करता येत नाहीत. स्वस्त व माफत दरातील औषधे मिळत नसल्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना नाईलाजास्तव बाजारभावाप्रमाणे दुसर्या दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. त्याचा भुर्दंड रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. ते औषध दुकान तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.

