पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात उन्हाळी पिकांखालील सरासरी क्षेत्र 3 लाख 49 हजार 759 हेक्टरइतके आहे, तर सद्य:स्थितीत कृषी आयुक्तालयाच्या ताज्या अहवालानुसार 4 लाख 8 हजार 975 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 117 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. दुष्काळी स्थिती असूनही उन्हाळी पिकांच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली असून, उन्हाळी भात, ज्वारी, बाजरीचा सर्वाधिक पेरा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उन्हाळी भाताचे सरासरी क्षेत्र 83 हजार 11 हेक्टर असून, प्रत्यक्षात 1 लाख 67 हजार 703 हेक्टरवर (202 टक्के), मक्याची सरासरी 58 हजार 12 हेक्टर क्षेत्र असून, 56 हजार 373 हेक्टरवर (97 टक्के), ज्वारीची 12 हजार 523 वरून 33 हजार 431 हेक्टरवर (267 टक्के), तर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी सरासरी 21 हजार 569 हेक्टरवरून 33 हजार 627 हेक्टरवर (156 टक्के)
पोहोचली आहे.दरम्यान, उन्हाळी मुगाची 11 हजार 262 हेक्टर (90 टक्के), उन्हाळी भुईमुगाची 75 हजार 696 हेक्टर (84 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.
राज्यात उन्हाळी तिळाचे सरासरी क्षेत्र 4 हजार 993 हेक्टरइतके आहे. प्रत्यक्षात तिळाचा पेरा 20 हजार 215 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 405 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे तिळाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा उंचावली आहे. राज्यात एकट्या धाराशिव जिल्ह्यात तिळाचे क्षेत्र 10 हजार हेक्टवर पोहोचले आहे.
हेही वाचा