मावळात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल समाधानकारक

मावळात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल समाधानकारक
Published on
Updated on

गणेश विनोदे : 

वडगाव मावळ : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात गतवर्षीच्या निकालामुळे तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे तीनतेरा झाल्याचे 'दैनिक पुढारी'ने वृत्तमालिकेद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याचा परिणाम म्हणून यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गतवर्षीच्या मानाने समाधानकारक निकाल लागला असल्याचे दिसते.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालानुसार यावर्षी मावळ तालुक्यातील परीक्षेस बसलेल्या इयत्ता पाचवीच्या 2 हजार 336 विद्यार्थ्यांपैकी 865 विद्यार्थी पास झाले आहेत. तर, 1 हजार 471 विद्यार्थी नापास झाले आहेत. आठवीच्या 909 विद्यार्थ्यांपैकी फक्त 86 विद्यार्थी पास झाले असून, तब्बल 823 विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच, गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळेचे 28 व खासगी शाळांचे 27 असे एकूण 55 विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

गतवर्षी केवळ 191 विद्यार्थी उत्तीर्ण

गतवर्षी इयत्ता पाचवीच्या परीक्षेस बसलेल्या 1 हजार 967 विद्यार्थ्यांपैकी फक्त 191 विद्यार्थी पास झाले होते. तर, तब्बल 1 हजार 776 विद्यार्थी नापास झाले होते. आठवीच्या 598 विद्यार्थ्यांपैकी फक्त 65 विद्यार्थी पास झाले व तब्बल 533 विद्यार्थी नापास झाले होते. तसेच, गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळेचे अवघे 12 व खासगी शाळांचे 22 असे फक्त 34 विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते. तसेच, तब्बल 65 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. त्यामुळे मावळचे स्थान जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सहाव्या तर खासगी शाळांमध्ये नवव्या स्थानावर होते.

यासंदर्भात 'दैनिक पुढारी'ने 'मावळचा शैक्षणिक विकास ठरतोय भकास', 'मावळच्या शैक्षणिक भकास अवस्थेला जबाबदार कोण ?' व 'शिष्यवृत्तीच्या शून्य टक्के निकाल लागलेल्या 65 शाळांना नोटिसा' अशी मावळ तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची वात्सव व भयानक स्थिती दर्शवणारी 'शिक्षणाचे तीन तेरा' ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. 'दैनिक पुढारी'च्या या वृत्तमालिकेमुळे शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आणि पुढील वर्षीच्या परीक्षेत गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने तयारीला लागला.

गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली

गेल्या वर्षभरात केलेल्या तयारीचा परिणाम म्हणून यावर्षीच्या निकालात समाधानकारक बदल झाल्याचे पाहावयास मिळाले. गतवर्षी 34 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते तर यावर्षी 55 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश मिळविले आहे. गतवर्षी 65 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. यावर्षी त्यात कमालीची घट झाली असून, 11 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. यावरून यावर्षीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा समाधानकारक असल्याचे दिसते.

'त्या' शाळांसह आठ शाळा यशस्वी

शिष्यवृत्ती परीक्षेत गतवर्षी गुणवत्ता यादीत यश मिळविलेल्या पिंपळोली, कान्हे, आढले बुद्रुक, साते व दिवड या पाच शाळांसह पुसाणे, किवळे व आढे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी गुणवत्ता यादीत यश मिळविले आहे. यामध्ये पिंपळोली शाळेतील तब्बल 11 विद्यार्थी तर कान्हे शाळेतील 5 विद्यार्थी, आढले बुद्रुक व किवळे येथील प्रत्येकी 3 पुसाणे व साते येथील प्रत्येकी 2 तसेच दिवड व आढे येथील प्रत्येकी 1 असे एकूण 28 विद्यार्थी गुणवत्ता यादीत  चमकले आहेत.

शून्य टक्के निकालात खासगी शाळा अव्वल
गतवर्षी मावळ तालुक्यातील 98 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 65 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. यावर्षी मात्र यामध्ये कमालीची घट झाली असून फक्त 11 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. याउलट परिस्थिती खासगी शाळांची आहे. यावर्षी तब्बल 60 खासगी शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या शून्य टक्के निकालात घाट झाली असली तरी खासगी शाळा मात्र अव्वल ठरल्या आहेत.

निकालाच्या गुपिताची अशीही चर्चा
गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे 'दैनिक पुढारी'ने निदर्शनास आणून दिले होते. यानंतर शिक्षण विभागाने गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या उपक्रमांसह यावर्षी माध्यमिक विभागाच्या शिक्षकांना बाजूला ठेऊन प्राथमिक विभागातील तेही त्याच केंद्रातील शिक्षकांना परीक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून नेमल्याने निकालात कमालीची वाढ झाल्याचीही विशेषतः शिक्षक वर्गातच चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मावळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने सहा कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. शब्दतरंग, प्रश्नपत्रिका सोडवणे, यशोदीप प्रश्नसंच असे विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यादृष्टीने शिक्षकांनी स्वयंप्रेणेने प्रयत्न करावेत यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे यावर्षीच्या परीक्षेत सुधारणा झाल्याचे दिसत असून, आगामी काळातही अधिकाधिक गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू राहतील.
                                             – सुदाम वाळुंज, गटशिक्षणाधिकारी, मावळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news