मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ बरखास्तीच्या मार्गावर ?

मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ बरखास्तीच्या मार्गावर ?
Published on
Updated on

वडगाव मावळ : मावळ तालुक्याच्या सहकार क्षेत्रात गेली 51 वर्षे कार्यरत असलेल्या मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघातील 4 संचालक अपात्र ठरले असून, 2 संचालकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मासिक सभा व तहकूब सभा अशा दोन्ही सभा कोरमअभावी रद्द झाल्या असल्याने अखेर वर्षभराच्या कालावधीतच संघ बरखास्त होण्याची शक्यता दिसत आहे.

एक जागा रिक्त : अशा सुस्थितीत असलेल्या खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक गतवर्षी झाली. यामध्ये अंकुश आंबेकर, गणेश भांगरे, सुदेश गिरमे, चंद्रकांत दहिभाते, सोपानराव कदम, कल्पना कांबळे, कांचन भालेराव, अमित ओव्हाळ, सूरज बुटाला व उमाजी भांडे हे 10 संचालक विजयी झाले. तर, एक जागा रिक्त राहिली. त्यानंतर सत्तेच्या राजकारणाला सुरुवात झाली यामध्ये चेअरमनपदी कांचन भालेराव तर, व्हाईस चेअरमनपदी अमित ओव्हाळ यांची निवड झाली.

वर्षभर चालला खेळ, तरी नाही बसला मेळ ! : संस्थेतील सत्तेच्या राजकारणावरून संचालकांमध्ये झालेले मतभेद, चेअरमन, व्हाइस चेअरमनपदी इतरांना संधी मिळावी, यासाठी वारंवार झालेल्या बैठका, एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करणारांनीच एकमेकांना वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न, काही संचालकांनी राजीनामा देण्याचा दिलेला इशारा असा खेळ गेली वर्षभर सुरू होता. अखेर काही संचालकांच्या आडमुठेपणामुळे मेळ बसू शकला नाही व एक वर्षातच संघ बरखास्त होण्याची वेळ आली आहे.

ज्येष्ठ संचालकांनीच दिले राजीनामे : संस्थेतील दहा संचालकांपैकी गणेश भांगरे, चंद्रकांत दहिभाते, सुदेश गिरमे व उमाजी भांडे हे चार संचालक अपात्र ठरले आहेत. त्यानंतर गेली 25 वर्षे संचालक म्हणून कार्यरत असलेले तसेच अनेक वर्षे चेअरमन म्हणून काम केलेले ज्येष्ठ संचालक अंकुश आंबेकर व गेली 30 वर्षे संचालक म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ संचालक सोपानराव कदम यांनी संचालक पदाचे राजीनामे दिले आहेत.

चार संचालकांची एकमेकांविरोधात तक्रारी

दरम्यान, सत्तेचे राजकारण व काही संचालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अल्पावधीच संचालकांमधील मतभेदाला सुरुवात झाली. चार संचालकांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. यामध्ये संबंधित चारही संचालकांवर अपात्रतेची कारवाई झाली. तर, तब्बल 25 ते 30 वर्षे सलग संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अंकुश आंबेकर व सोपानराव कदम या दोन संचालकांनी गेल्या महिनाभरात राजीनामे दिले. त्यामुळे आठवड्यापूर्वी झालेली संस्थेची मासिक सभा व आज झालेली तहकूब सभा अशा दोन्ही सभा कोरमअभावी रद्द झाल्या आहेत. त्यामुळे संघ बरखास्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरमअभावी रद्द झालेल्या सभेसंदर्भात सहायक निबंधक अधिकार्‍यांना लेखी अहवाल सादर करणार असल्याचे सचिव धनंजय बर्गे यांनी सांगितले. तर, अहवाल आल्यानंतर संस्थेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सहायक निबंधक कांदळकर यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

51 लाखांच्या ठेवी बँकेत

सन 1972 साली मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची स्थापना झाली असून, वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समितीच्या आवारात संस्थेचे स्वत:चे कार्यालय आहे. संबंधित कार्यालयाचे नूतनीकरण गतवर्षी झालेल्या निवडणुकीपूर्वीच मागील पंचवार्षिक कालावधीतील काही ज्येष्ठ संचालकांच्या पुढाकाराने करण्यात आले असल्याने संस्थेचे सुसज्ज कार्यालयही आहे. याशिवाय तब्बल 51 लाखांच्या ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत.

तब्बल 51 वर्षे कार्यरत असलेल्या संघात पदाधिकारी म्हणून गेली 25 वर्षे काम करत आहे. कर्जदारांना सुलभतेने कर्ज वाटप करणे अशी वाटचाल असलेल्या संस्थेचे कार्यालय गेले सात-आठ महिन्यांपासून एक-एक महिना बंद असते. सभासदांना कर्जवाटप योजनेचा लाभ दिलाच पाहिजे, ही संचालक म्हणून आमची जबाबदारी आहे; परंतु संस्थेमध्ये चाललेल्या गलथान कारभारामुळे लाभ देता येत नाही. संस्थेच्या वार्षिक मीटिंगला संस्थेचे सचिव यांनी उपस्थित न राहता साधी हिशोबपत्रकेसुद्धा दिले नाही. त्यामुळे राजीनामा दिला आहे.

– अंकुश आंबेकर

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news