डिंभे धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ; साठवणक्षमतेवर परिणाम

डिंभे धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ; साठवणक्षमतेवर परिणाम

मंचर : पुढारी वृत्तसेवा : डिंभे धरणाच्या(हुतात्मा बाबू गेनू सागर) जलाशयात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे शासनाने गाळ काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी व वीटभट्टीच्या मालकांनी केली आहे.

डिंभे धरणात सध्या 0.34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणपात्र कोरडे पडले आहे. धरणाचे बांधकाम होऊन 49 वर्षे झाली आहेत. तेव्हापासून धरणात गळ साठत आहे. यामुळे धरणाची पाणी साठवणक्षमता कमी झाली आहे. या धरणातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. या धरणातील पाणीसाठ्यावर पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे.

पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. त्यामुळे डोंगर उतारावरून पाण्याबरोबर मातीही वाहून येत धरणात साठते. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. यासाठी धरणातील गाळ काढणे गरजेचे झाले आहे. या भागातील शेतकरी व वीट व्यावसायिकांना गाळ काढण्यास परवानगी दिल्यास गाळाचा उपसा होऊन पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे शासनाने कोरड्या पडलेल्या धरणातील गाळ काढण्यास परवानगी देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news