ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा अन् ’ईद मुबारक’

ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा अन् ’ईद मुबारक’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठणात सहभागी झाले. त्यानंतर घरोघरी बिर्याणीसह शिरखुर्म्याचा सहकुटुंब आस्वाद घेतला. 'ईद मुबारक' म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत शनिवारी आनंदात ईद -ऊल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली.

ईदच्या निमित्ताने मशिदींमध्ये सकाळी सामूहिक नमाज पठणाचे आयोजन केले होते. ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. कोंढवा, कॅम्प, कोरेगाव पार्क, खडकी, औंध, बोपोडीसह ठिकठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र आले. नवीन कपडे परिधान करीत त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. घरोघरीही ईदच्या निमित्ताने मोठ्यांनी छोट्यांना ईदी दिली. विविध संस्था-संघटनांतर्फे सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.

सकाळपासून घरोघरी ईदचा उत्साह पाहायला मिळाला. बिर्याणीसह विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात आले आणि त्यानंतर काहींनी घरीच नमाज पठण केले, तर काहींनी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण केले. शहरातील विविध मशिदींमध्येदेखील त्यांच्या वेळेनुसार सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सोशल मीडियाद्वारेही ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गरजूंनादेखील यानिमित्ताने दान करण्यात आले.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज अदा करण्यात आली. राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी याप्रसंगी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. देशात सुख, समाधान, शांतता नांदो आणि देशात भाईचारो नांदो, अशी दुवाँ करण्यात आली.

ईदगाह मैदान ट्रस्ट, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, पुणे महापालिका, लष्कर पोलिस ठाणे शांतता कमिटीतर्फे मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त आर.एन.राजे हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, सुनील कांबळे, दिलीप कांबळे, ईदगाह ट्रस्टचे जैनूल काझी आदींनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. ईदगाह मैदान येथे मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news