

खडकवासला: राजगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून चारशे फुट खाली संजीवनी व सुवेळा माचीच्या वाटेवर कोसळून विवाहित महिलेचा मृत्यू झाला. कोमल शिंदे (वय 21, रा.आळंदी), असे या महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वेल्हे पोलिस तपास करीत असून, अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कोमल व तिचे पती राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. दुपारी गडावर पाऊस पडल्याने गडाच्या पाऊलवाटा निसरड्या झाल्या. सायंकाळी पाच वाजता कोमल या बालेकिल्ल्याच्या बिकट वाटेवरुन खाली कोसळल्या. (Latest Pune News)
जवळपास चारशे फुट खाली संजीवनी व सुवेळा माचीच्या पायी मार्गावर त्या पडल्या. कड्याच्या खडकावर आपटून त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर मार लागला. त्यानंतर मोठ्याप्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते संकेत खरात व रामभाऊ ढेबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोंघानी मृतदेह पद्मावती माचीवरील राजसदरेच्या प्रांगणात आणला. गडाचे खासगी संस्थेचे सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल या चढताना पडल्या का उतरताना खाली कोसळल्या याची नेमकी माहिती नाही.
दरम्यान, वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार पी. एच. सुर्यवंशी यांच्यासह स्थानिक पोलिस पाटील विश्वास शिर्के, राजगडचे पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापू साबळे, हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन रेक्सु पथकाचे तानाजी भोसले आदींनी राजगडावर धाव घेतली.
अंमलदार ज्ञानदीप धिवार यांनी, घटनेची माहिती सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिसांसह रेस्क्यू पथकाला गडावर रवाना केले. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे धिवार यांनी सांगितले.