

सुवर्णा चव्हाण
पुणे : मराठी रंगभूमीनेही आता आधुनिकतेकडे झेप घेतली असून, मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नेपथ्यासाठी व्हिज्युअल इफेक्टचा वापर, साऊंड इफेक्टसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर अन् अगदी नाटकातील एखादा प्रसंग जिवंत करण्यासाठी स्क्रीनचा वापर... मराठी नाटकांमध्ये या प्रयोगांमुळे अधिक प्रभावीपणा आला असून, या नावीन्यपूर्ण प्रयोगांना प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे..(Latest Pune News)
नेपथ्यामध्ये तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला आहे आणि त्यामुळे नाटकातील प्रत्येक प्रसंग अधिक उठावदार होत आहेत. ‘ठरलंय फॉरएव्हर’, ‘अमेरिकन अल्बम’, ‘आजीबाई जोरात’... ही आहेत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या काही नाटकांची नावे. जादुई वाडा दाखविण्यासाठी केलेला थ्रीडी इफेक्टचा वापर असो, वा व्हिडिओ कॉलचा प्रसंग दाखविण्यासाठी केलेला एलईडी स्क्रीनचा उपयोग... तंत्रज्ञानामुळे मराठी नाटकांचा दर्जाही उंचावला आहे. नाट्यगृहात बसून आपण जणू एखादा चित्रपट पाहत असल्याची अनुभूती यामुळे प्रेक्षकांना येत आहे.
मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटक, संगीत नाटक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवे प्रयोग होऊ लागले आहेत. काळाप्रमाणे बदलत आता नाट्यनिर्माते आणि दिग्दर्शक तंत्रज्ञानाच्या वापरासाठीही पुढाकार घेत असून, अनेक नव्या नाटकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे साऊंड इफेक्टसाठी एआयचाही आधार घेतला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी नाट्यनिर्मात्यांनी वेगळी टीमच तयार केली असून, मराठी नाटकांचेही रूप पालटले आहे. आज बुधवारी (दि. 5 नोव्हेंबर) साजऱ्या होणाऱ्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने या ट्रेंड विषयीचा आढावा घेतला.
नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामध्ये पहिल्यांदा तंत्रज्ञानाचा वापर नेपथ्यासाठी करण्यात आला. सध्या नाटकातील सेटसाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. क्षणात नाटकाचा सेटही बदलत असून, एखादी बाग दाखविल्यानंतर लागलीच एखादा वाडा असे बदलते सेटही नाटकांचे वैशिष्ट्य ठरत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी निर्माते काही निधीही खर्च करत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नाटकांचा दर्जाही उंचावला असून, नाटकांच्या प्रयोगांची संख्याही वाढली आहे.
मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक निर्माते-दिग्दर्शक करीत असून, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून एखादा प्रसंग दाखविण्यापासून ते व्हीएफएक्सपर्यंतचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. नाटकाच्या कथेनुसार नाटकाचा सेटही असावा, यावर भर दिला जात आहे आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले जात आहे. काही नाटकांमध्ये एखादे जंगल दाखविण्यासाठी व्हिज्युअल इफेक्टचाही वापर होत असून, आम्हीही आमच्या नाटकात व्हिडिओ कॉलवरील संवाद दाखविण्यासाठी मोठ्या स्क्रीनचा वापर करीत आहोत आणि या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
भाग्यश्री देसाई, नाट्य निर्मात्या
आज माध्यमे बदलली आहेत तसेच तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे, त्यामुळे आपण काळाप्रमाणे चालले पाहिजे, याच विचाराने आता निर्मार्त्यांकडून, दिग्दर्शकांकडून विविध प्रयोग होत आहेत. साऊंड इफेक्टसाठी आणि व्हिडिओसाठी एआयचा वापरही होत आहे. तर नेपथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात आहे, आम्हीही बालनाटकासाठी थीडी इफेक्टचा वापर केला होता. या बदलांमुळे मराठी नाटकाने आता आधुनिकतेकडे झेप घेतली आहे.
राहुल भंडारे, प्रमुख कार्यवाह, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ