निरा : निरा (ता. पुरंदर) येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ही घटना रविवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. पुणे येथून निरामार्गे लोणंदच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. (Pune Latest News)
ओबीसी नेते लक्ष्मण हाके काही कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्ह्यातील बोरीकडे (खंडाळा) जात होते. पुरंदर तालुक्यातील निरा येथे चहासाठी ते थांबले. याबाबतची माहिती तरुणांना मिळताच हॉटेलबाहेर येऊन तरुणांनी हाके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ’तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करता?’ असा जाब मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांना विचारला. यानंतर हाके यांनी या वेळी रस्त्यावरच बैठक मांडली. सोबत हाके यांच्या बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
मनोज जरांगे यांचे मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त आहेत. राज्य सरकारकडून जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसतानाच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांविरोधात बोलत आहेत. यातूनच हाके यांच्याविरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेवर मराठा आंदोलकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कोणत्याही पद्धतीचा हल्ला केला नसल्याचे मत मराठा आंदोलकांनी व्यक्त केले आहे. हाकेंवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. पण, आम्ही हल्ला केला नाही. आम्ही फक्त त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. आम्हाला आरक्षणाची गरज आहे.
आमच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. मलाच नाही तर प्रत्येक गरजवंत मराठ्याला आरक्षणाची गरज असल्याचे मराठा आंदोलक म्हणाले. आम्ही तिथे फक्त ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी केल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली.