पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाने ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर अधिक फायदा होईल, असा सल्ला संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे. गायकवाड म्हणाले, सध्या ओबीसींना मिळणार्या आरक्षणापैकी 18 ते 19 टक्के वाटा कुणबी समाज उचलतो. त्यामुळे मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यास आरक्षणाचा खूपच कमी वाटा मराठा समाजाला मिळेल.
मात्र, आर्थिक निकषावर मिळणार्या 10 टक्के आरक्षणांपैकी मराठा समाजाच्या वाट्याला आठ ते साडेआठ टक्के वाटा येत असल्याचे दिसते. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहे, असेही गायकवाड म्हणाले.
ओबीसीमधून मराठा समाजाला तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल. त्याउलट ईडब्ल्यूएसमधून आरक्षणातून आरक्षण घेतल्यास 10 टक्क्यांपैकी 8 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. 90 च्या सुमारास मराठा सेवा संघ स्थापन झाला.
मराठा सेवा संघाने मराठा आणि कुणबी हे एकच असल्याची भूमिका मांडली. 1967 पूर्वीच्या दस्तऐवजाच्या आधारे आरक्षण घेतले जाऊ लागले. मात्र, मराठा आणि कुणबी या स्वतंत्र जाती असल्याने जातीचा दाखला देणार्या अधिकार्यांसमोर प्रश्न निर्माण होऊ लागले असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
एससी, एसटी हे जात प्रवर्ग आहेत. तर, ईडब्ल्यूएसमधून आरक्षण हे खुले आरक्षण आहे. जातीसाठी हे आरक्षण नाही. एकदा जर मराठा तरुणाने कुणबी प्रमाणपत्र घेतल्यास त्याला ईडब्ल्यूएसमधील आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकत नाही, असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे
हेही वाचा