राजेंद्र खोमणे
नानगाव: दौंड तालुक्यातील ज्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुका लवकर होणार आहेत आणि सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्या गावांतील इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. गावात येताना, कार्यक्रमाला जाताना तसेच वरिष्ठांकडे जाताना कार्यकर्ते घेऊनच ये-जा सुरू झाली आहे.
अशातच काही जण ‘काहो सरपंच, काय म्हणतीया ग्रामपंचायत निवडणूक?’ असे गमतीने विचारतात, तर लगेच हा पठ्ठा छाती वर काढत ‘यंदाची निवडणूक आपणच लढवणार आणि जिंकणार,’ असे म्हणत ‘जेव्हा बघताय तुम्ही माझ्याकडं, मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय,’ अशी काहीशी परिस्थिती इच्छुकांची झाल्याची चर्चा सुरू आहे. (Latest Pune News)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आणि इच्छुक लगेचच कामाला लागले. कारण, ‘रात्र छोटी आणि सोंगं मोठी’ या म्हणीप्रमाणे निवडणुकीत दिवस कधी निघून जातात, हे कळत नाही.
ही भावी सरपंचमंडळी सध्या गावात चांगले कडक कपडे घालत आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हिकडे-तिकडे फिरताना दिसतात. याचाच अर्थ अशा इच्छुक उमेदवारांना सरपंचपदाची स्वप्न पडूं लागली आहेत. त्यामुळे आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे गावागावांत चर्चांना उधाण आले आहे.
गावागावांतून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे कोणाला खाली बसवायचं आणि कोणाला निवडणुकीत उभं करायचं? असा प्रश्न गावागावांतील गटांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या स्पर्धेत आपण टिकायचे, यासाठी काहींनी आत्तापासूनच कार्यकर्त्यांना व गावातील ग्रामस्थांना चहापान करण्यास सुरुवात केली आहे.
इच्छुक उमेदवारांची गावात एन्ट्री होताच पारावर, चौकात बसलेल्या ग्रामस्थांत चर्चा सुरू होतात. यंदाच्या निवडणुकीत अमूकतमूक सरपंचपदासाठी इच्छुक असून, निवडणूक रिंगणात उभा ठाकणार आहे, तर त्यांच्याविरोधात अमूक एक उमेदवार असणार आहे, अशा चर्चांना उधाण येऊ लागले आहे. त्यामुळे गावागावांतील निवडणुकीत ग्रामस्थ देखील हवा भरताना दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक जरी दूर असली, तरी चर्चेचा धुरळा तर गावागावांत उडणारच.
खर्चाची चर्चा
सगळ्या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक ही खूपच वेगळी असते. निवडणुकीच्या काळात मटण, दारू आणि लक्ष्मीदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, सरपंचपदाच्या उमेदवाराला गावभर फिरावे लागणार असून, यंदा सरपंचपदाच्या उमेदवाराला किती खर्च करावा लागणार, याची देखील चर्चा सुरू झाली आहे.