

बारामती: गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या मैदानी खेळांना ब्रेक मिळाला आहे. मुख्यत्वे मोबाईलच्या विश्वात आता चिमुकली पिढी रममाण झाली आहे.
उन्हाळी सुट्यांमध्ये गावी जाऊन मौजमस्ती करणे धूसर बनत चालले आहे. सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात मामाचे गाव मुलांना परके होऊ लागले आहे. एक काळ असा होता की, कधी एकदा उन्हाळी सुट्या लागतात आणि मुलांना घेऊन मामाच्या गावी जायचे असा प्लॅन आखला जात होता; मात्र ट्युशन, कोर्स, उन्हाळी शिबिरे आदींच्या व्यापात लहान मुलांना मामाचे गाव दिवसेंदिवस परके होऊ लागले आहे. (Latest Pune News)
’झुक-झुक आगीनगाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया- मामाच्या गावाला जाऊया’ ही कविता सध्या पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहिली आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिरेकापूर्वी सर्वच लहान मुलांच्या शाळेला उन्हाळी सुटी लागली की, प्रत्येक जण मामाच्या गावाला जाऊन सुटीचा आनंद लुटत होते.
मात्र आजच्या यांत्रिक युगात प्रत्येक जणच भौतिक सुविधांच्या मागे लागला आहे. आजच्या तंत्रयुगात टीव्ही, मोबाईलमध्ये रमलेली बच्चेकंपनी मामाचा गाव विसरली आहेत. पालकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या प्रचंड अपेक्षा यामुळे लहान मुलांचे बालपण हरवून जात आहे.
सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही. यामुळे आज कुटुंबसंस्थेला आपलेपणाची जाणीव कमी होत आहे. या सर्वांमुळे मामांचे गाव मात्र सर्वांसाठी परके होऊ लागले आहे. सध्या शहरातच जवळचे नातेवाइकांकडे जास्त सुटीचा आनंद मुले घेत आहेत.
आई-वडिलांप्रमाणेच मुलेही मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करू लागल्याने एकत्र कुटुंबात संवाद कमी झालेले चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात पूर्वी गोट्या खेळणे, लगोर, चेंडू, सूरपारंब्या, रानावनात भटकून रानमेव्याचा आस्वाद घेणे, बैलगाडीचा प्रवास, शेतातील फेरफटका, औतावर बसण्याची मजा, विहिरी-तलावांमध्ये मनसोक्त डुंबणे, घरातील कुटुंबांना शेतात मदत करणे, एकत्रित जेवणे आता हे चित्र आजच्या युगात लोप पावत चालले आहे.
विभक्त कुटुंब पद्धती, नातेवाईकांमधील वाद, नोकरी-व्यवसाय, पाल्यांकडून अवाजवी शैक्षणिक अपेक्षा, सुटीतही क्लासची व्यस्तता, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे.
ग्रामीण भागाला बच्चेकंपनी मुकली
पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब पद्धतीत घरातील प्रत्येक सदस्याला मान-सन्मान दिला जात असे. पौराणिक कथा, कादंबर्या, ग्रंथांचे वाचन केले जात असे. सध्या तरुण पिढी मात्र वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. गावची धमाल आता कथा कादंबर्यांतून मुलांना ऐकावी, वाचावी लागत आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने बच्चे कंपनी ग्रामीण भागातील जीवनाला मुकली आहे.