

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त व सहायक आयुक्तांच्या आयुक्त शेखर सिंह यांनी अचानक बदल्या केल्या. कमी महत्त्वाचा विभाग दिल्याने नाराज झालेले काही अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे पालिका कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात संबंधित बेशिस्त अधिकार्यांवर आयुक्तांनी कोणतीही कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कामचुकार, संथगती कारभार करणारे, कामात बेशिस्तपणा असणार्या उपायुक्त व सहायक आयुक्त अशा 18 अधिकार्यांच्या आयुक्त सिंह यांनी 13 एप्रिलला अचानक बदल्या केल्या. मात्र याचबरोबर कार्यक्षम अधिकार्यांचे आहे ते विभाग कायम ठेवले आहेत.
महत्त्वाचा विभाग काढून कमी दर्जाच्या विभाग दिल्याने तसेच, अनुभव कमी असलेल्या अधिकार्यांना महत्त्वाचे विभाग दिल्याने काही उपायुक्त व सहायक आयुक्त नाराज झाले आहेत. बदली झाल्याच्या दिवसांपासून काही अधिकारी दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत.
त्यात उपायुक्त सचिन ढोले, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी यांचा समावेश आहे. तर, 'ह' क्षेत्रीय कार्यालयात पदभार घेतल्यानंतर सहायक सुषमा शिंदे या रजेवर गेल्या आहेत. तर, पालिकेच्या विरोधात मॅटमध्ये गेलेल्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी नागरी सुविधा केंद्र विभागाचा पदभार अद्याप घेतलेला नाही. बदली झाल्यापासून हे अधिकारी गायब असल्याने पालिकेच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. या बेशिस्त व मनमर्जी अधिकार्यांवर कारवाई न करता आयुक्त सिंह यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतल्याने महापालिका वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील किवळे येथे लोखंडी होर्डिंग कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाला. तर, 3 जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. पालिकेने मृतांना व जखमींना कोणतीही आर्थिक मदत जाहीर केली नाही. तसेच, पालकमंत्री व विरोध पक्षनेत्यांनी मृतांचे नातेवाईक व जखमींना भेट देऊन साधी विचारपूस केली नाही. त्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे. घटना घडली त्या वेळेस घटनास्थळी किंवा रुग्णालयात आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख उपायुक्त सचिन ढोले व नवीन विभागप्रमुख सहायक आयुक्त प्रशांत जोशी हे दोघेही उपस्थित नव्हते.
शहरातील पाच व्यक्तींचा नाहक बळी गेला असताना अधिकारी म्हणून तसेच, माणुसकीच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित राहणे अत्यावश्यक होते. जबाबदार अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, किवळे दुर्घटनेप्रकरणी आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या परवाना निरीक्षकांना आयुक्तांनी साधी नोटीसही बजावलेली नाही.
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील हे दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच, ठेकेदारांवर तातडीने कारवाई करत होते. गरज पडल्यास फौजदारी कारवाई करण्यास ते मागे पुढे पाहत नव्हते. किवळे होर्डिंग दुर्घटनेच्या प्रसंगी त्यांची उणीव भासत आहे. ते असते तर, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांना त्यांनी तात्काळ घरचा रस्ता दाखविला असता, असी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
केवळ 22 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे 181 चौरस किलोमीटर क्षेत्रात वसलेल्या आणि तब्बल 30 लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या आरोग्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी आहेत. पालिकेत ते स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात दिल्लीवरून पथक दाखल झाले असता ते गैरहजर होते. मोठ्या शहरात काम करण्याचा अनुभव नसलेल्या आणि शारीरिकदृष्ट्या अनफिट असलेल्या अधिकार्यांकडे संपूर्ण आरोग्य विभागाची जबाबदारी देणे कितीपत योग्य आहे, असा प्रश्न पालिकेचे अधिकारी खासगीत विचारत आहेत.
हे अधिकारी रजेवर आहेत
उपायुक्त सचिन ढोले- 17 एप्रिल ते 4 मे
सहायक आयुक्त प्रशांत जोशी- 17 एप्रिल ते 4 मे
सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर- 21 मार्च ते 4 मे
सहायक आयुक्त सुषमा शिंदे- 24 ते 28 एप्रिल
उपायुक्त स्मिता झगडे- अद्याप नवीन विभागाचा पदभार घेतला नाही