

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: ओतूर आणि परिसरात गेली अनेक दिवस पावसाने थैमान घातले असून बुधवार (दि. २०) च्या मध्यरात्रीपासून धुंवाधार बरसत असलेल्या पावसामुळे मांडवी नदीला पूर आलेला आहे. परिणामी ओतूरच्या स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
चिल्हेवाडी धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून चिल्हेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. सुमारे १० हजार क्यूसेकवरून तो विसर्ग थेट दुप्पट करण्यात येऊन २० हजार ५०० क्युसेक वेगाने मांडवी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी नदीपात्राबाहेर जाण्याची शक्यता असल्याने नदी किनाऱ्याच्या सर्व गावातील नागरीकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने दिले आहेत.