

संतोष वळसे पाटील
मंचर: आंबेगाव तालुक्यासाठी मंचरला स्वतंत्र एस.टी. आगार होऊनही तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर्वीप्रमाणे एस.टी. बससेवा उपलब्ध होत नसल्याने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मंचर एस.टी. आगाराकडे वारंवार मागणी करूनही बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी-प्रवासी यांनी संताप व्यक्त केला आहे.
आंबेगाव तालुक्यात स्वतंत्र एस.टी. आगार व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. माजी मंत्री आ. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याने मंचर येथे स्वतंत्र एस.टी. आगार झाले खरे; मात्र आगार सुरू होऊन देखील तालुक्यात सुरळीत बस उपलब्ध होत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
पूर्वी राजगुरुनगर तसेच नारायणगाव एस.टी. आगारातून मिळणारी सेवा यापेक्षा चांगली होती, अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने एस.टी. महामंडळाच्या गाड्या वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मंचर आणि घोडेगाव एस.टी. बसस्थानकातून अनेकदा महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना लवकर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. पूर्व भागातील विद्यार्थ्यांना वेळेत बस मिळत नाही. कधी-कधी रात्री सहा, सात वाजेपर्यंत बसस्थानकात थांबावे लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण असते.
यापूर्वी आंबेगाव तालुक्यात राजगुरुनगर व नारायणगाव आगारातून चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा उपलब्ध होती असे प्रवासी, विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे. मंचर एस.टी. आगाराकडे असणार्या बसपैकी अनेक बस नादुरुस्त आहेत. अनेकदा प्रवासात त्या बंद पडतात. माजी मंत्री आ. दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत मंचर आगाराचे व्यवस्थापकाचे तातडीची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना कराव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.
बसस्थानकात साचते पाणी
मंचर एस.टी. आगारात खड्ड्यांची समस्या कायमच असते. हेच कमी की काय पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे पायदळ येणाऱ्या प्रवाशांना तेथे खड्डा आहे याची कल्पना नसते. परिणामी ते खड्ड्यात जाऊन अपघाताची शक्यता वर्तविण्यात येते. हेच नव्हे तर एस.टी. बस या खड्ड्यातून प्रवास करताना प्रवाशांच्या अंगावर पाणी उडवत असल्याने प्रवाशांना ओलेचिंब होऊन प्रवास करावा लागत असल्याची खेदजनक माहिती त्यांनी दिली.