

मंचर: आंबेगाव तालुक्यात पाणी असूनही शेतपिके वाळून जाण्याचा धोका महावितरणच्या विजेच्या लपंडावामुळे वाढला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. परंतु, वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पिके जळून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरण कंपनीने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत शेतकर्यांकडून व्यक्त केले जात आहे.
आंबेगाव तालुक्यातील कृषी पंपासाठी आठ तास वीज दिली जाते. यामध्ये चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्रीची वीज दिली जाते. मात्र, विजेचा वारंवार लपंडाव सुरू आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याची सायकल पूर्ण होत नाही. (Latest Pune News)
या प्रकारामुळे पाणी असूनही पिके वाळून जात आहेत. तसेच महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. या प्रकारामुळे वीज असूनही कृषी पंप सुरू होत नाही. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून हा प्रकार वाढला आहे. शेतकरी वारंवार महावितरण कर्मचारी, वायरमन यांच्याशी संपर्क करूनही उपाययोजना होत नाही.
वीजमाफीमुळे तक्रारींकडे डोळेझाक?
सध्या तालुक्यातील तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसवर गेल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. मात्र, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेक कार्यालयांत अपुरी कर्मचारीसंख्या असून, कंत्राटी कर्मचार्यांची संख्या जास्त आहे. या कर्मचार्यांना मर्यादा असतात.
तरीही या कर्मचार्यांकडून धोकादायक पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. ही कामे नीट नाही झाली, तर त्याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. साडेसात एचपीपर्यंत वीजमाफी असल्याने या शेतकर्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शेतकरी कंटाळून सौरऊर्जा पंप घेण्याकडे कल वाढला आहे.
यंदाचा उन्हाळा कमालीचा असह्य झाला आहे. सकाळी 10 पासूनच उन्हाच्या तीव्रतेने नकोसे होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा हा तडाखा कायम राहतो आहे. त्यात विजेचा लपंडाव सातत्याने सुरू आहे. वीजग्राहक सातत्याने तक्रारी करीत असतानाही त्याची दखल घेतली जात नाही.
- सुनील बाणखेले, माजी उपसरपंच, मंचर
उन्हाळ्यात थंड पाण्याची बाटली, लस्सी, विविध प्रकारच्या आईस्क्रीम व अन्य थंडपेये दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातात. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने अशा पदार्थांचे मोठे नुकसान होत असून, त्यातून व्यावसायिकांना फटका बसत आहे.
- अजय काटे, आस्वाद हॉटेल, मंचर