

मंचर : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळजवळील नांदुर गावातील वीटभट्टीवर घडलेली ही घटना माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली आहे. डॉक्टरांनी वीटभट्टीवरील एका महिलेची प्रसूती चक्क मोबाईल टॉर्चच्या उजेडात केली आहे.
आनंदवाडी फाट्याजवळ शनिवारी (दि. २५) रात्री एकच्या सुमारास संगीता सागर सोनवणे (वय २५ या वीटभट्टी कामगार स्त्रीला अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्या ठिकाणी प्रकाशाची कोणतीही सुविधा नसल्यामुळे मोबाईलच्या उजेडातच डॉ. संतोष शिंदे आणि रुग्णवाहिका चालक महेश वालकोळी यांनी धाडसीपणे प्रसूती केली. या कठीण परिस्थितीतही आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
रात्री साडेबाराच्या सुमारास आरोग्यसेवक दीपक पडवळ यांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून डॉक्टरांना बोलावून घेतले. अत्यंत झोपडीवजा घर, अंधार आणि बाहेर पडलेली कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत ही प्रसूती करावी लागली. डॉ. संतोष शिंदे आणि रुग्णवाहिकाचालक महेश वालकोळी यांच्या तत्परतेमुळे संगीता सोनवणे आणि त्यांच्या २४०० ग्रॅम वजनाच्या बाळाचे प्राण वाचले आहेत. त्यानंतर दोघांनाही मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कार्यामुळे नातेवाईकांसह गावकऱ्यांनी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचे आभार मानले.
कठीण परिस्थितीत आई आणि बाळाचे प्राण वाचवणे हीच खरी आमच्यासारख्या डॉक्टरांची खरी जबाबदारी असते. मोबाईलच्या उजेडात का होईना, पण जीव वाचवणे हाच आमचा धर्म आहे.
डॉ. संतोष शिंदे, मंचर.