

पुणे: चॉकलेटच्या बहाण्याने सात वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या नराधमाला दुहेरी जन्मठेपेसह तीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. उमेश विष्णू जाधव (वय 40, रा. उत्तमनगर. मूळ रा. कुर्डूवाडी, जि. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे.
ही घटना 26 जुलै 2016 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी, पीडित मुलाच्या 28 वर्षीय आईने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडिताला चॉकलेटच्या बहाण्याने खोलीत बोलाविले. त्यानंतर, त्यास मारहाण करत रुमालाने गळा दाबून अनैसर्गिक अत्याचार केले. (Latest Pune News)
हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून डोक्यात दगड घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. या वेळी डॉक्टरसह न्यायवैद्यक शास्त्रज्ञाने दिलेला अहवाल महत्त्वाचा पुरावा ठरला. आरोपीच्या कपड्यावर पीडित मुलाच्या रक्ताचे डाग आढळून आले. ते न्यायवैद्यक विभागाने दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. असल्याने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी अॅड. कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत शिक्षा सुनावली.