काळाच्या ओघात मामाचे गाव ’हरवले’; शहरी बच्चे कंपनी ग्रामीण भागातील जीवनाला मुकली

काळाच्या ओघात मामाचे गाव ’हरवले’; शहरी बच्चे कंपनी ग्रामीण भागातील जीवनाला मुकली

पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कधी एकदाची शाळेला उन्हाळी सुट्या लागतात आणि मामाच्या गावाला जातोय ही कल्पना आज धावपळीच्या व आधुनिकतेच्या काळामध्ये धूसर होत असल्याचे दिसत आहे. 'झुक झुक झुक आगीनगाडी… धुरांच्या रेषा हवेत सोडी… पळती झाडे पाहूया .. मामाच्या गावाला जाऊया…' ही कविता शाळांना सुटी लागली की प्रत्येक विद्यार्थाला आठवते. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात वाढते ट्युशन, कोर्स, उन्हाळी शिबिर आदींच्या व्यापात लहान मुलांना मामाचे गाव परके होऊ लागले आहे.

1990-1995 चा एक काळ होता, त्यावेळेस सर्वच लहान मुलांच्या शाळेला उन्हाळी सुटी लागली की प्रत्येकजण मामाच्या गावाला जाऊन सुटीचा आनंद लुटत होते. मात्र आजच्या यांत्रिक युगात प्रत्येकजणच भौतिक सुविधांच्या मागे लागला आहे. आजच्या तंत्रयुगात मात्र टीव्ही, मोबाईलमध्ये रमलेली बच्चेकंपनी मामाचा गाव विसरली आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही. यामुळे आज कुटुंबसंस्थेला आपलेपणाची जाणीव कमी होत आहे.

या सर्वांमुळे मामांचा गाव मात्र सर्वांसाठी परके होऊ लागले आहे. सध्या शहरातच जवळचे नातेवाईकांकडे जास्त सुटीचा आनंद मुले घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनाचा आनंदाला ते मुकत आहेत. पूर्वी उन्हाळी सुटी लागली की, मामांच्या गावाला मुलांची धमाल असायची. आजी-आजोबा, मामा-मामी, मामा, मावशीची मुले असे सर्वजण मिळून मंडळी गोंधळ घालत असत.

तर मामाच्या गावातील इतर मित्र झालेल्यांसोबत गोट्या, लगोर, चेंडू, सूरपारंब्या खेळणे, रानावनात भटकून रानमेव्याचा आस्वाद घेणे, बैलगाडीचा प्रवास, शेतातील फेरफटका, औतावर बसण्याची मजा, विहिरी-तलावांमध्ये मनसोक्त डुंबणे, मामा-मामींना कामात मदत करणे असा भरगच्च कार्यक्रम असायचा. तर सकाळी नाष्टा, रात्री जेवणाची पंगत, तर अनेकदा आजीने जपून ठेवलेल्या खाऊची मज्जा तर औरच असायची अन् सुटी संपल्यावर नवीन कपडे घालून पुन्हा आपल्या घरी येताना मोठी ऐट असायची.

मात्र, आता हे चित्र आजच्या युगात लोप पावत चालले आहे. विभक्त कुटुंब पद्धती, नातेवाईकांमधील वाद, नोकरी-व्यवसाय, पाल्यांकडून अवाजवी शैक्षणिक अपेक्षा, सुटीतही क्लासची व्यस्तता, वाढती महागाई आदी गोष्टीदेखील या बदलांना कारणीभूत आहेत. 21व्या शतकात वाटचाल करीत असताना मुलांची स्वप्न मात्र हिरावून घेत आहोत हे पालकांच्या लक्षातही येत नाही. यापुढे मामाच्या गावची धमाल आता कथा कादंबर्‍यांतून मुलांना ऐकावी, वाचावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news