Malin Village: नव्या माळीणला पाणी, विजेची प्रतीक्षाच

अकरावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी; सौरऊर्जेवर पाणी मिळावे असे नागरिकांचे मत
Malin Village
नव्या माळीणला पाणी, विजेची प्रतीक्षाचPudhari
Published on
Updated on

अशोक शेंगाळे

भीमाशंकर: माळीण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नातेवाइकांसाठी सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे घोषित केले. त्यानुसार घटनेतून बचावलेल्या लोकांच्या पुनवर्सनासाठी नव्या माळीणची निर्मिती करण्यात आली. या नव्या गावातील नागरिकांमध्ये आजही सुरक्षिततेची भावना वाटत नाही तसेच येथे पाणी, विजेसारख्या मूलभूत गरजांसाठी अजूनही लढा सुरू असल्याचे दिसून येते.

माळीण दुर्घटनेत 44 कुटुंबांतील 151 लोकांचा ढिगार्‍याखाली सापडून मृत्यू झाला. त्या वेळी गावातील 9 लोक जखमी अवस्थेत सापडले, तर 38 जण बाहेरगावी असल्याने वाचले. शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगार्‍याचे खोदकाम केले. त्यातून 151 मृतदेह बाहेर काढले. (Latest Pune News)

Malin Village
Open Farm Ponds: शेततळी की मृत्यूची कुपी? उघडी शेततळी बनत आहेत निष्पाप बालकांच्या मृत्यूचे कारण

या आठ दिवसांत विविध नेत्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. अनेक सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, कंपन्यांनी माळीणला सढळ हातने मदत केली. विविध संस्था व लोकांनी तहान-भूक विसरून पडेल ते काम केल्याचेही महाराष्ट्राने पाहिले. माळीण या ठिकाणी आसाणे-पाईर डोह बंधार्‍यासारखा मोठा बंधारा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी उंडेवाडीच्या वर गाय चोहंड येथील जागेचा दोनदा सर्व्हे करण्यात आला आहे.

ही जागा योग्य असल्याचे जलसंपदा अधिकार्‍यांनी सांगितले आहे. तर, जुने माळीण ते वरसूबाई मंदिर व मोहणवीर वस्तीत नवीन वीज खांबांचे प्रस्ताव दिले आहेत. त्यास दोन वर्षे झाले असली, तरी त्याला मंजुरी मिळाली नाही. या परिसरात सौ-ऊर्जेवर शेतीसाठी पाणी मिळावे तसेच अकरावी, बारावीचे वर्ग रयत शिक्षण संस्थेच्या वतीने माळीण फाटा येथे सुरू करावेत, अशा मागणीचे पत्र माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी सांगितले.

कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष

नवीन गावठाणात भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागते. येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे तसेच स्मृतिस्तंभाजवळ होत असलेल्या निवाराशेडचे काम निकृष्ट होत आहे. पेव्हिंग ब्लॉकही व्यवस्थित बसविले जात नाहीत. नवीन गावठाणातील व मुख्ये रस्ते खराब झाले आहेत, असे येथील शिवाजी लेंभे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात टँकरचाच पर्याय

येथील नागरिकांच्या बहुतांश लोकांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. या पिण्याच्या पाण्यासाठी येथील बोअर, विहिरीचे स्रोत वाया गेले आहेत. उन्हाळा सुरू होताच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. कधी तर जुन्या गावालगत विहीर, हातपंपावरून, तर नदीपात्रात डवरा उकरून पाणी वाहून आणावे लागत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

Malin Village
Baramati News: बारामती प्रांत कार्यालयासमोर ठिय्या; अपघातानंतर जनभावना तीव्र

पावसाळ्यात घरे गळतात

या नवीन माळीण पुनर्वसनात 48 घरांचे वाटप करण्यात आले. ही घरे भूकंपविरोधी आहेत. असे असले तरी येथील अनेक घरे पावसाळ्यात गळतात. घरभर ओलावा पसरतो. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. या घटनेतील 13 कुटुंबांना घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे अजूनही दोन कुटुंबे पुनर्वसनावेळी बांधलेल्या पत्राशेडमध्येच राहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news