

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सन 2022-23 मध्ये तुटून आलेल्या उसाची उर्वरित रक्कम प्रतिटन 360 रुपये एकरकमी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना देणार आहे. तसेच साखर कामगारांना देखील 21 टक्के बोनस देण्याचे धोरण ठरले आहे. सोमवारी (दि 30) संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदींसह संचालक उपस्थित होते.
माळेगाव साखर कारखाना प्रशासनाने गाळप हंगाम सन 2022-23 मध्ये तुटून आलेल्या उसाला राज्यात उच्चांकी असा 3 हजार 411 रुपये ऊसदर जाहीर केला आहे. ऊस दर जाहीर करताना 100 रुपये प्रतिटन डिस्टलरी विस्तारीकरणासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारखाना प्रशासनाने अद्याप प्रतिटन 2 हजार 851 रुपये आणि 100 रुपये कांडेबिल असे एकूण 2 हजार 951 रुपये सभासदांच्या खात्यावर जमा केले आहेत. जाहीर केलेल्या 3 हजार 411 रुपये प्रतिटन ऊस दरामधील 460 रुपये उर्वरित रक्कम रकमेपैकी 100 रुपये कपात वजा जाता 360 रुपये प्रतिटन एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेटकेन-धारकांना प्रतिटन 150 रुपये देणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप यांनी दिली.
कारखाना कामगारांना देखील 21 टक्के बोनस जाहीर केला आहे. यामधील 16 टक्के बोनस दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. उर्वरित बोनस संक्रातीच्या दरम्यान देण्यात येणार आहे. रोजंदारीवरील कामगारांना देखील दिवाळीसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार आहे, असे जगताप यांनी नमूद केले. सदरची रक्कम दिवाळी पूर्वी ऊस उत्पादक शेतकरी सभासद तसेच कामगारांच्या खात्यावर जमा केली जाईल अशी माहिती कार्यकारी संचालक पाटील यांनी दिली.
दै. 'पुढारी'चे कौतुक
माळेगाव कारखान्याने गाळप हंगाम सन 2022-23 मध्ये तुटून आलेल्या उसाची उर्वरित रक्कम प्रतिटन 460 रुपये एकरकमी देण्याची सभासदांची मागणी दै. पुढारी मध्ये प्रसिध्द झाल्यानेच कारखाना प्रशासनाने प्रतिटन 360 रुपये एवढी रक्कम एकरकमी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून सभासदांनी दै.पुढारी चे कौतुक केले.